अगदी रोखठोक शब्दांत सांगायचे तर ज्याने मेहनत केली आहे त्या मेहनतीचे श्रेय त्या माणसालाच मिळायला हवे. दुर्दैवाने हल्ली 'आयजी च्या जीवावर बायजी उदार..' अशी अवस्था सुरु आहे. आज नव्वदटक्के लोकांना त्यांच्या मेहनतीची किंमत आणि फळ मिळत नाही. मात्र, वशिलेबाज काही न करता इतरांच्या मेहनतीवर मोठेपण मिळवितात हे पाहून खूप वाईट वाटते..
आज ' माझे ही माझे आणि तुझे ही माझे..' अशा स्वभावाच्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. इथे आवर्जून असे सांगावेसे वाटते की आपल्या सोबतची सर्व मंडळी प्राणपणाने काम करीत असतांना लोकांना हे सर्व मीच केले आहे असे सांगून आपल्या त्या सहकारी मंडळींचे श्रेय आपण स्वतः लाटण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. काही धूर्त मंडळी एकमेकांत आणि मित्रा मित्रांत भांडणे लावून स्वतःचा विकास करण्याचा आणि स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. पण, खोटे हे खोटेच असते ते कधीतरी उघड होतेच मग ही मंडळी धोब्याच्या कुत्र्या प्रमाणे ' ना घरका ना घाटका..' या अवस्थेत पोहोचते. विश्वास ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एकदा का विश्वास मेला की मग तुम्हाला कुणीच खिजगणतीत धरीत नाही. आणि म्हणूनच लोकांची मेहनत चोरणाऱ्या आणि स्वतःच्या नावे खपविणाऱ्या व्यक्तीसाठी ' मेहनत करे मुर्गा अंडा खाये फकीर..' अशी म्हण वापरली जाते..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.