शब्द खड्ग आढावा..
सध्या पत्रकार आणि डॉक्टर नर्सेसवर जे हल्ले होत आहेत त्या संदर्भात आपल्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने सर्वसामान्य लोकांना छेडले असता या लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदविल्या. काही बिनधास्त बोलले तर काही घाबरत बोलले. राजकीय गुंडांची आणि पोलिसांची सुद्धा या लोकांच्या मनात इतकी दहशत आहे की, आम्ही बोलतो पण कृपा करून आमचे नाव छापू नका अशी या लोकांनी विनंती केली..
या सर्वसामान्य लोकांच्या मते राजकारणी माजले आहेत. आपले कुणीच वाकडे करू शकत नाही. पैसा आणि सत्तेच्या जोरावर आपण काहीही करू शकतो आणि सर्वांना मॅनेज करू शकतो असा यांना विश्वास आहे. आणि हे खरे ही आहे. अगदी अल्पस्वल्प अपवाद वगळता सर्वसामान्यांशी उद्धटपणे बोलणारे आणि सर्वसामान्यांना कायद्याचा धाक दाखविणारे आणि फोडून काढणारे खूपसे पोलीस या राजकारण्यांपुढे शेपूट घालून बसतात. यांची दादागिरी गोर-गरिबांवरच चालते असे शंभर टक्के लोक बोलले. पोलिसांना माणुसकीचे धडे द्या असेही खूप लोकांनी सांगितले. पैसे आणि गुंडगिरीच्या जोरावर काही राजकारणी मंडळी निवडणुकीच्या वेळी यांच्या समोर इतर कुणाला उभं राहू देत नाहीत व मग स्वतः बिनविरोध निवडून येतात हे कायद्याने बंद करा.. लोकशाहीत निवडणूक लढवूनच हार अथवा विजय मिळायला हवा असे सुद्धा लोक बोलले. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट देऊ नये व त्यांनी कुणाला मारझोड केल्यास त्यांचे पद काढून घ्यावे व त्यांना निवडणूक लढविण्याची कधीच परवानगी देऊ नये. पत्रकार आणि डॉक्टरांनी सुद्धा कुणाशी विनाकारण हुज्जत घालू नये. जमेल तेवढी मदतच करावी..
एकुणात या सर्व गोष्टींचा विचार केला तर आम जनतेचा राजकारण्यांवर जितका राग आहे तितकाच राग पोलिसांवर सुद्धा आहे हे इथे आवर्जून सांगावेसे वाटते आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.