मनातलं पान..
तिच्याकडे नव्हते वडा किंवा भजीसाठी पैसे.. म्हणून तिने पावात मसाला भरून घेतला. तिची नजर इकडे तिकडे जातच नव्हती.. जेमतेम सात वर्षाची पोर सोबत तिचा चार वर्षाचा भाऊ. त्यालाही ती वडापाव भजीपाव खाणा-यांची तोंडं बघू देत नव्हती. वयाच्या सातव्या वर्षी परिस्थितीने तिला जणू सत्तरीतली अक्कल दिली होती. पण त्याची नजर लाजेचे सारे बांध तोडून भिरभिरत होती. काय करणार पोटात भूक होती. एखाद्याकडे इतकं असत की संपता संपत नाही आणि एखाद्याला एकवेळच्या जेवणाचीही भ्रांत.साला घ्यायचाच कशाला माणसाचा जन्म. पण जन्म घेणं थोडच आपल्या हातात असतं. दुरून हे दृश्य बघणा-या माझ्या डोक्यात अनेक प्रश्नांच काहूर माजलं होतं. त्या चार वर्षाच्या मुलात मी माझं तेव्हाचं बालपण शोधत होतो.परिस्थितीतीचा आसूड लहानपणीच अनुभवल्याने या मुलांची वेदना मला जास्तच टोचत होती.
मी वडापाववाल्याला म्हटलं पाच वडापाव पार्सल दे..त्याने पार्सल तयार केलं माझ्या हाती दिल. मी ते त्या मुलीच्या हातात कोंबल. तिने ते घेण्यास स्पष्ट नकार दिला. नाही नको म्हटली. वडापाववाला म्हटला ए पोरी घे ना ते देतात तर. तिचा नकार ठाम होता. वडापाववाला म्हटला सर भिकारड्यांनाच खूप माज असतो. ती मुलगी शांतच होती..तिने जमवलेली चिल्लर त्याच्याकडे सोपवली. जायला निघाली. पण मी ही माझा हट्ट सोडतच नव्हतो. वडापाववाला म्हटला सर तुम्ही वाईट सवय लावताय. अहो यांना काम न करता फुकटात खायची सवय लागेल. मी त्याला म्हटल हम्म तुमचंही खरंच आहे म्हणा. पण तरीही मी हट्ट सोडलाच नाही व ते वडापावचं पार्सल त्या मुलीला दिलच. ती मुलगी खजिल झाली आणि निघून गेली. मी मनातून सुखावलो. वडापाववाला म्हटला काय हे सर ? मी फक्त हसलो..त्याने पाहिले फक्त मी दिलेले दोन चार वडापाव. पण मी पाहिला होता त्या मुलीचा स्वाभिमान तिची समज. आज बुद्धीपेक्षा माझ्या हृदयाने बाजी मारली होती. भूक काय असते, अगतिकता काय असते समाज कसे रंग बदलतो हे खूप लहानपणीच मी अनुभवलं होतं. प्रश्न वडापावचा नव्हताच भूकेचा होता आणि त्या चार वर्षाच्या लहान मुलाच्या चेह-यावर वडापाव खायला मिळणार या आनंदाचा होता. त्या मुलाचा आनंद खरेदी करून देण्या इतका मी श्रीमंत नसलो तरी त्यावेळे पुरतं त्याच्या चेह-यावर मी समाधान दिलं होतं. कारण त्याच्यात मी माझ्यासारख्या अनेकांचं बालपण पाहिलं होतं..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.