बोलणे ही कला आहे. मात्र, कुठे बोलावे, काय बोलावे, कसे आणि किती बोलावे हे ज्याचे त्याला कळायला हवे. माझं म्हणाल तर मी स्वतः आयोजित केलेल्या कार्यक्रमांत मनसोक्त बोलतो. इतरांच्या कार्यक्रमांत अथवा जिथे आपल्या विचारांना प्राधान्य नसेल अशा ठिकाणी मी हाताची घडी तोंडावर बोट अशा अवस्थेत राहतो. माझ्या मते जिथे बोलायला हवे तिथे न डगमगता आपण बोलले पाहिजेच. पण, कधीकधी रोखठोक आणि वास्तववादी स्पष्ट बोलल्याने खूप लोक नाराज होतात. खरे बोललेले सख्या आईला सुद्धा आवडत नाही असे म्हणतात. पण, उगीचच एखाद्याची कुवत नसतांनाही त्याला गोड गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढविणे हे सुद्धा चूक आहे. कारण असे केल्याने त्या समोरच्या व्यक्तीचा कधीच विकास होत नाही. सत्य ऐकण्याची सुद्धा तयारी हवी.. म्हणून बोला पण जे ऐकणारे आणि आपल्या खास मर्जीतील असतील त्यांच्या समोरच बिनधास्त बोला. कारण अनोळखी आणि आंधळ्यांच्या शहरात आरसे विकण्यात काहीच हाशील होत नाही..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.