पाऊस बेभान उनाड होतो..

पाऊस ती मी आणि आठवणींच्या कोप-याचा कोलाज.. कॕनव्हास तोच मात्र रंग गरजे नुसार बदलणारा.

गळकी छत्री आयुष्याची आणि आडोशांचे सहारे. जगणं गढूळ होत चाललंय आताशा.. माणूस मात्र निर्ढावलाय आतून..

वरवर सारी वादळापुर्वीची शांतता.

कोपरे दोन वेगवेगळ्या कोनातले.. जणू तिचा आणि माझा वेगवेगळा पाऊस.

हा पाऊस हसवतो भिजवतो थिजवतो रडवतो.. आणि उगाचच डोळ्यांच्या ढगांत गच्च भरून येतो.

हल्ली महागलाय तो माणूसकी आणि महागाई सारखा खूपच..

पाऊसही जातीपातीत विभागलाय की काय हल्ली. ? पाऊस झोपडीवर आणि महालावरही एकच

बिछाणे गरम करणारा मात्र गरीबी आणि श्रीमंतीचे कोंब जन्माला घालणारा..

मक्याचं कणीस शेगडीत होरपळतंय

त्याला लिंबू मीठ चोळलं जातय..

एक बुट्टा निंबू मारके भैय्या ओरडतोय

आणि कोप-यावरून भिका-याचं पोर हे सारं आधाशी नजरेने पाहतंय.

गालिचे थोडेसे रंग उडालेले बदलले जात आहेत हलक्या पावसाने.. आणि दुसरीकडे छप्पर गळतंय

झाकायला पत्रा नाही.

पाऊस जुलमी आहे तिला आत बाहेर भिजवतोय..

बदलायला कपडेच नसल्याने ती

अंगाभोवती फाटकी चादर गुंडाळून निर्वस्त्र होतेय.. करतेय स्वतःचं लज्जा रक्षण..

आणि दुसरीकडे ती न भिजताही कपडे उतरवतेय सताड उघडी

लाज तिच्या गावीही नसल्याचं जाणवतय.. अगदी ठळकपणे..

पाऊस खूपदा डोळ्यांतून बरसतो

मरतात उपाशीपोटी शेतकरी त्याच्या

सुल्तानीचा मुका मार खात..

ती कोप-यावरून तिच्या डोळ्याच्या कोनातून पुन्हा माझ्याकडे चोरून बघतेय.

मी छत्री विसरलेला ती हाती छत्री असलेली.

आयुष्यच जणू विरोधाभास झालंय..

रस्ता सुस्तावलाय आणि रात्र चळलीय चेकाळलीय बरीच..

मी ब-यापैकी भिजलोय 

बाजूच्या टपरीवरचा कटींग चहा पितोय थरथरत तरीही 

कुडकुडतंय शरीर खालवर..

ती पाहतेय माझ्याकडे खोल आणि

मी अंग चोरून उभा आहे..

एक पाॕश गाडी तिच्या जवळ थांबते 

ती आतल्या माणसाशी काहीतरी कुजबुजते..

दरवाजा उघडतो आत बसण्या आधी ती

माझ्याकडे तुच्छतेने पाहते मग गाडीत बसते..

गाडी सुसाट निघून जाते..

चहावाला तिच्या जाणा-या गाडीकडे पाहून थुंकतो आणि

जोराने बोलतो रांड साली..

मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहतो.

सभ्य वाटत होती मी मनाशीच पुटपुटतो..

एक रिक्षा येतांना दिसते मी रस्त्यावर उतरतो

रिक्षा थांबते मी ओलाचिंब आत बसतो..

पाऊस काय गंमत आहे नाही

कुणाला आनंदात कुणाला पाण्यात कुणाला दुःखात तर कुणाला

शुभ्र चादरींवर भिजवतो.

पाऊस हा असा हवाहवासा कधी बेभान तर कधी उनाड होतो..

- प्रा. दिपक जाधव..संपादक शब्द खड्ग..

58

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.