रेल्वे ब्रिजवर ती उभी असायची. खरंतर तिच्या सारख्या पाच सात.
त्या काहीच न करता देखील घ्यायच्या लक्ष वेधून..
ती त्यांच्यात लहान असावी..
दोन पाचशे रूपयांची बोली लावीत
त्या स्वतःच स्वतःच्या शरीराची.
अगदी कळकटलेले उपाशी परींदे घालायचे त्यांच्या भोवती घिरट्या..
घासाघिस करून सौदा ठरल्यावर पाडायचे त्यांच्या शरीराचा फडशा..
पोटापुढे नागडं होणं विशेष नव्हतंच जणू हे करतांना मन मेलं होतं..
कुचंबना होऊ लागली ब्रिजवर उभं राहणा-या माता भगिनींची.
लोक त्यांनाही त्याच नजरेने पाहत. रोष वाढत गेला तक्रार पुन्हा केली..
मग पोलीसांनी त्यांची काठीने जबरी
धुलाई केली..
मी तिथेच हे सारं पाहत होतो..
वृत्तपत्रात वारांगणां बद्दल मी ही खूपदा लिहिलं होतं.
तिच्या पायावर जेव्हा बसली काठी तिने कळवळून हंबरडा फोडला.
माझ्यातला पत्रकार खजील झाला.
त्या गंदगी आहेत धंदा करतात. पण, समाज त्यांना जगू देतो का ?
त्या आहेत म्हणून आया बहिणी आहेत खूपशा सुरक्षित..
त्यांच्या चमडीची कुणीही लावावी परवडेल तशी किंमत ??
त्या धंदा करतात सचोटीने अगदी गि-हाईकाचं समाधान होईस्तोवर..
त्या त्यांच्या कामाप्रती आहेत प्रामाणिक..
आपण आपल्याशी तरी प्रामाणिक आहोत का ?
अगदी रोग्या भोग्यांना तृप्त करतांना त्या होतात स्वतः रोगी..
मग गाठतो खितपत मारणारा मृत्यू..
त्यांचा उद्धार करू पाहणारे ही खूपदा
टाकतात त्यांच्यावर हात.
धंदेवाली साली दुनिये बरोबर केलंस
तेव्हा लाज नाही वाटली ?
आता आमचं काय ??
समाजाची मुक्ताफळं..
अहो हौसेने कुणी वेश्या होईल का ?
पुनर्वसन कुठवर आलं यांचं असं.. गर्दीतून कुणीतरी ओरडतो.
काहीच करण्याचं धाडस न करणारा
व्हाईट काॕलर ही चोरट्या नजरेने
तिचा देह चाळून टाकतो..
आयुष्याची रोज ब्रिजवर लागते बोली..
दोनशे रूपयात शरीराचा खुर्दा उडतो.. आपण दोनशेचा हाॕटेलात नाश्ता करतो..
पोलीसांच्या काठ्यांचे तडाखे वाढतात.. ती माझ्याकडे बघत राहते.
यांना सन्माननीय रोजगार मिळावा मन व्याकुळ होत जातं..
त्यांना कुत्र्यासारखं ओढून नेलं जातं..
मी यांच्या पोटावर बातमी लिहून लाथ तर मारली नाही ना.. मन खात राहतं..
दोन चार दिवस असेच जातात.
ब्रिज तसाच, ट्रेन ही त्याच, आणि त्या
पुन्हा लाली पावडर लावून कधी ब्रिजवर
तर कधी ब्रिज खाली गि-हाईकांची
वाट पाहत उभ्या राहतात..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.