आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपली नाळ कापून टाकली आहे.. सुख म्हणा, गरज म्हणा किंवा अपरिहार्यता म्हणा. मात्र, आणखी जास्त सुख मिळविण्याच्या नादात आपण आपल्या मातीपासून खूप दूर आणि पुढे निघून गेलो आहोत. आता गाव फक्त आठवणींतच उरलेलं आहे..
तेव्हा गावात बहुतांश लोकांची परिस्थिती बेताची होती. पण, त्यात सुद्धा लोक खुश होते. एकमेकांच्या सुख दुःखात लोक सहभागी होत होते. एकत्र कुटुंब असल्याने लहान मुलांवर चांगले संस्कार होत होते. तरुणांच्या नजरेत वयोवृद्ध मंडळींबद्दल आदर होता.. पण आपण कधीच न संपणारी उरी फुटेपर्यंतची शर्यत धावू लागलो आणि रक्त ओकून मरू लागलो. आपण मागे फिरण्याचे सर्व दोर कापून टाकले. खूप लोकांनी चांगले पैसे कमवले. पण, ते जे हातून सटकून गेलं, जे खूप मागे पडलं ते सुख कितीही किंमत मोजू पाहिली तरी काही विकत घेता आलं नाही आणि विकत घेता येणारही नाही.. त्या आंब्याच्या झाडावरच्या चोरून पाडलेल्या कच्या कैऱ्या, पेरू, चिंचा, नदीत डुंबणे, सायकलच्या टायरला दांडूने मारीत गावभर फिरणे, लगोरी, गोट्या, विटी-दांडू, भातुकली, माझ्या मामाचं पत्र हरवलं असे अनेक खेळ आणि ते पावसात भिजणे, पाण्यात कागदाच्या होडया सोडणे, रात्री अंगणात बसून एकत्र जेवण करणे, शेकोटीच्या उबीमध्ये गप्पा मारणे आणि रात्री घरातील आजी किंवा आजोबांनी सांगितलेली गोष्ट ऐकता ऐकता लागलेली झोप सारे सारे मागे पडले.
आठवडाभर लागून राहणार पाऊस, पागोळ्यांखाली भिजण्याची मजा, नदी, शाळेला दांडी, गावचे सणवार आणि सगळं अगदी सगळं आज पुन्हा खुणावीत आहे. पण, काळ मात्र खूप पुढे गेला आहे.. भौतिक सुखाच्या नादात आपण आत्मिक सुख हरवून बसलो आहोत. आपण आपल्या गरजा इतक्या वाढवून ठेवल्या आहेत की त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला बैला पेक्षा जास्त राबावे लागत आहे.. आपल्यासारख्या अनेकांच्या मनात हे आठवणींचं गाव आजही जिवंत आहे.. आज गावही बऱ्याच प्रमाणात बदललं आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे हे सुद्धा मान्य आहे. तरी सुद्धा अजूनही बऱ्यापैकी गाव हे गावच आहे.. आपणही तेच आहोत.. मात्र, गावाकडचा रस्ता मात्र आपण विसरलो आहोत..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.