चेहऱ्या मागचे चेहरे..

आपल्या घरात.. मैत्रीत.. आजूबाजूला.. आणि आपल्या स्वतःतही अनेक चेहरे लपलेले आहेत. या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचे गणित सहजा सहजी कुणालाच सोडवता येत नाही..

सगळीकडे गर्दीचा महापूर.. आयुष्य हा एक रंगमंच आहे.. इथे प्रत्येकाला आपापली भूमिका वठवायची असते. आपली भूमिका संपली की आपल्याला रंगभूमी सोडावी लागते आणि मग नवीन कुणीतरी चेहरा आपली जागा घेतो अथवा घेते.. हा निसर्ग नियम आहे जो जन्म घेतो त्याला मरण येतेच. जर काही शाश्वत असेल तर तो केवळ मृत्यू आहे.. खरं तर मृत्यू हे अंतिम सत्य असूनही आपण हे स्वीकारत नाही.. गौतम बुद्ध म्हटल्या प्रमाणे आपल्याला आपल्या दुःखाचे कारण शोधता आले तर हे जगणे सुखकर होईल. मात्र, आपण हे माझे ते माझे हे करण्याच्या नादात आपल्या गरजा वाढवून ठेवल्या आहेत आणि मग या गरजा पूर्ण करण्याच्या नादात आपल्या हातातून वाळू जशी निसटून जाते तसे आयुष्य निसटून जाते.. आपल्या पैकी अनेकांच्या मनात अनेक वादळं खदखदत असतात. मात्र, आपण लोकांमध्ये वावरतांना आपल्या मनातील व्यथा सहसा अगदी कुणासमोर मांडीत नाही.. हसऱ्या चेहऱ्या पाठी अनेक वेदना वावरत असतात. आपण इतके बेरकी झालेले आहोत की आपल्याला खूपदा शक्य असूनही आपण गरजवंताची मदत करायला मागे पुढे पाहतो. अर्थात काही लोक आपल्या चांगल्या स्वभावाचा गैर फायदा सुद्धा घेत असतात.

आज आपण आरशाला सुद्धा फसवू लागलेले आहोत. रोज अंतर्मुख होऊन माझ्या हातून आज काय चूक झाली याचा विचार करण्याची आपल्याला गरजच उरलेली नाही.. अनेक चेहरे वेगवेगळे भाव घेऊन रस्त्यावर, गाडीत, ट्रेन मध्ये, गर्दीत, विमानात, जहाजात.. अगदी बघाल तिथे वावरत आहेत.. एक वाहतुकीला सहकार्य करणारे साधन म्हणून रस्ता आपल्याला जगभरात पोहोचवतो. मात्र, दुसऱ्या बाजूने विचार केला असता हा रस्ता कधीच कुठेच जात नाही तो तिथेच शांत पडलेला असतो. मात्र, या रस्त्यापेक्षा जास्त वेगवान आपले मन असते. ते मन मात्र सगळीकडी क्षणार्धात जाऊन येते.. पण तरी हे चांगले वाईट चेहरे.. आपल्या संपर्कातील अमुक तमुक अशी काहीबाही नावे असलेले चेहरे आपण जपायलाच हवेत. कारण हे चेहरे निष्प्राण झाले की क्षणार्धात तुमचे नांव इतिहास जमा होते आणि लोक म्हणतात आली का बॉडी.. म्हणून कसे ही असो हे चेहरे आपण समजून घ्यायला हवेत आणि आपापल्या परीने यातील जीवाला जीव देणाऱ्या चेहऱ्यांना फुलवायला हवे..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

123

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.