नोकरी नाही म्हणून खूपशी मराठी मुले नशिबाला, परिस्थितीला आणि सरकारला दोष देत राहतात. मात्र, या पैकी फार कमी मराठी मुले व्यवसायात उतरतात. माफ करा पण आपल्या मराठी मुलांकडे अगदी सर्व आहे पण पेशन्स नाहीत असे म्हटल्यास कुणाला राग येण्याची गरज नाही. उपाशी मरणे अथवा चोरी मारी करण्यापेक्षा मेहनतीने कमवून खाणे कधीही चांगले. मी जनरल बोलतोय बरे..
इतका सारा शब्द प्रपंच करण्याचे कारण की आमच्या घरी एसी दुरुस्त करायला आलेला मुलगा रवी गुप्ता, सिलेंडरची शेगडी आणि रबर ट्यूब लावायला आलेला राजस्थानी, बेड वरची गादी बनवून देणारा सुद्धा युपी, बिहारवाला. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला महाराष्ट्रीयन भेटला नाही काय ? केला ना खूप प्रयत्न. पण शोधूनही पटकन कुणी सापडलाच नाही.. कारण या व्यवसायांत मराठी माणसांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. आणि आपल्या गरजेला या लोकांनी वेळेत यायला हवे ना. आपल्या मराठी माणसाला अपवाद वगळता खूप राग आहे. आपण किंमत थोडीही कमी करीत नाही. मग कोण तुम्हाला काम देणार हो ? आपल्याला आपल्या स्वभावात थोडासा बदल करायलाच हवा.
आज आपल्या तोंडातला घास दुसरी मंडळी हिसकावून घेत आहेत. का तर त्यांना कामाची गरज आहे आणि त्यांना कुठल्याच छोट्या मोठ्या कामाची लाज नाही. आणि मेहनत करणारा मग तो कुणी का असेना त्याला त्याचा मोबदला मिळायलाच हवा. आपल्या आजूबाजूला छोट्या मोठ्या व्यवसायात शोधून पहा किती मराठी मुले, माणसे भेटतात ते.. मेहनत करणारा कधीच उपाशीपोटी राहत नाही आणि कामाची लाज कशाला वाटायला हवी हो.. उगीचच त्रागा आणि शोधूनही नोकरी लागतच नसेल तर मराठी मुलांनी छोट्या व्यवसातून सुरुवात करायला काय हरकत आहे. मला इतकेच सांगायचे आहे. बाकी आपण सर्व समजदार अहातच..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.