पूर्वी मराठी माध्यमात दिवाकर यांनी लिहिलेला 'बोलावणं आल्याशिवाय नाही..' हा अप्रतिम धडा होता.. आज याच अनुषंगाने तुमच्याशी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते तुमच्या पैकी अनेकांनी अनुभवले असेलच..
दिवाकर अगदी खरं बोलले आहेत. कुठलाही आनंदाचा कार्यक्रम असूदेत.. लग्न, वाढदिवस, गेट टुगेदर अथवा इतर काही आनंद सोहळा.. जर आपल्याला आमंत्रण नसेल, कुणी त्या घरच्या महत्वाच्या मुख्य माणसाने बोलावलं नसेल तर, इतर कुणाच्या सांगण्यावरून अशा ठिकाणी आपण जायचेच नाही. आपण गरीब आपल्या घरचे. पण स्वाभिमान विकून स्वतःची किंमत अजिबात कमी करायची नाही.. जिथे मान नाही.. जिथे आपल्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो व जिथे आपल्याला गृहीत धरून शून्य केले जाते अशा ठिकाणी आपण मरेपर्यंत पाय ठेऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे. आमंत्रण देण्याचे सुद्धा दोन तीन प्रकार आहेत..
एक आमंत्रण थेट असते.. एक व्हाया व्हाया असते आणि एक आमंत्रण थेट असते मात्र ते समोरच्याने द्यायचे म्हणून दिलेले असते. काही ठिकाणी आपल्याला बोलवतात मात्र यथायोग्य सन्मान करीत नाहीत.. एकुणात तात्पर्य काय तर मी सांगितले आहे, तुला यायचं तर ये आणि नाही आलास तरी चालेल. फक्त आपल्याला इतरांकडून कळले व वाईट वाटले तर म्हणून खूपदा अशी खोटी आमंत्रणे दिली जातात. ज्या आमंत्रणाच्या बोलण्यात आपुलकी आणि जिव्हाळा नसेल अशा आमंत्रणाचा कधीच स्वीकार करू नये.. मी सध्या अनुभवतोय मी इतरांना मोठं करण्याचा त्यांना माझ्यापरीने पोस्टर बनवून गाजविण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. मात्र माझे काही असेल तर यातील काही अपवाद वगळता खूपसे लोक द्यायच्या म्हणून शुभेछया देतात. कुणी स्वतःहून माझे पोस्टर बनवीत नाही.. यात आपुलकी फार कमी असते.. आणि म्हणूनच कुठेही जात बसायचं नाही. जिथे मान आहे आणि ज्या आनंदयात्रेत आपल्याला सन्मानाने बोलावणं आलं असेल अशाच ठिकाणी जायचं.. मग कुणाला काय वाटायचे ते वाटूदेत..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.