कुणावर कुठल्या वयात कुठली जबाबदारी येईल हे सांगता येत नाही. एक मात्र खरे की जबाबदारीने माणूस परिपक्व व परिपूर्ण होतो..
कधीकधी हालाखीची परीस्थिती सात वर्षाच्या मुला - मुलीला जो समाजाचा आणि प्रत्यक्ष जगण्याचा अनुभव देते तो अनुभव लहानपणापासून सुखवस्तू जगलेल्या सत्तरीच्या म्हातारा म्हातारीला सुद्धा नसतो. आणि म्हणूनच अनुभवा सारखा गुरु नाही असे म्हणतात. होते काय की, खूपदा आपल्यावर स्वतःच्या, घरातल्यांच्या इतक्या जबाबदाऱ्या येऊन पडतात की त्या पूर्ण करण्याच्या नादात हातातून वय सटकून, निसटून जाते. आणि हे सटकून, निसटून गेलेले वय आपल्याही लक्षात येत नाही. मग आयुष्याच्या संध्याकाळी खिडकीतून बाहेर मावळणाऱ्या सूर्याला पाहून, खेळणारी बागडणारी मुले पाहून अरे आपल्याला जगताच आले नाही असे खूप लोकांना वाटून जाते.. मित्रांनो काही गोष्टी नशिबातच लागतात आणि त्या गोष्टी त्या त्या वयातच जास्त शोभून दिसतात.. वय उलटून गेल्यावर तुमच्याकडे चणे असतात पण ते खायला दात नसतात अशी अवस्था होते..
आयुष्य म्हणजे एक सारीपाट आहे आणि आपण त्यावर मांडल्या गेलेल्या सोंगट्या.. वेळ संपली की आयुष्याचा डाव संपतो.. अगदी काल काल तर मी लहान होतो आणि आज अगदी सत्तरी पार केली असे अनेक आजोबा आजींसोबत बोलतांना मी ऐकले आहे. सगळं जमलं रे पण या जमवा जमवीत स्वतःसाठी जगण्याचा मेळ काही बसवता आला नाही असे खूप लोक माझाशी संवाद साधताना हताश होव बोलतांना मी ऐकले आहे. आणि म्हणूनच कुणी वृद्ध व्यक्ती जगण्याचा मनमुराद आनंद घेत असेल तर व्यक्तिशः मी आणि आपला शब्द खड्ग पेपर अशा लोकांना प्रोत्साहन देतो व सदैव अशा लोकांसाठी कार्यक्रम आयोजित करतो.. मित्रांनो आयुष्य एकदाच मिळते आणि म्हणून आपल्याला ते जसे जमेल तसे मनमुराद आणि बिनधास्त जगता यायला हवे.. नव्हे नव्हे आपण ते बिनधास्तच जगावे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.