मित्रांनो तोंडातून गेलेला शब्द आणि हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच माघारी येत नाही.. आणि म्हणून आपण शब्द आणि वेळ दोन्हीही पाळायलाच हवी..
एखाद्याची आपण दिवसभर वाट बघत बसतो की तो फोन करेल अथवा साधा एक मेसेज करेल. पण, खूपदा असे होतच नाही. नाती टिकवायची असतील तर संवाद दोन्ही बाजूने व्हायला हवा. म्हणजे एकालाच गरज आहे आणि दुसऱ्याला तुमची गरजच नाही. तो अथवा ती तुम्हाला वेळच देत नाही असे जर वारंवार घडत असेल तर त्या नात्याला मग ते कुठलेही असो अजिबात अर्थ नसतो.. जे आपले असतात ते कितीही बिझी असले तरी आपल्यासाठी पाच मिनिट तरी वेळ काढतातच, आणि आपल्या आयुष्यात काय घडते आहे याचा मागोवा घेतात.. आणि जे आपले नसतात फक्त मजबुरीने कधीमधी आपल्याशी बोलत असतात ते माझ्याकडे अजिबात वेळ नाही अशी कारणे देतात. मुळात आपली माणसे कारणे देतच नाहीत.. आपली माणसे थेट आपल्याशी बोलतात..
शब्दाचे सुद्धा असेच असते आणि म्हणून बोलतांना दहादा विचार करून बोलावे कारण हाताने मारलेलं लोक विसरून जातात मात्र शब्द कायम मनात घर करून राहतात. मुळात जे आपल्याला शक्य नाही जे आपल्याला जमणारच नाही त्या कामासाठी उगीचच कुणाला शब्द देऊ नये.. मित्रांनो आपल्याला वेळेचे नियोजन करता यायला हवे. कारण वेळ खूप मौल्यवान असते. जे हातून सटकलं ते पुन्हा शक्यतो सावरता येत नाही. मला आज तुमची गरज आहे आणि तुमच्याकडे वेळ असूनही तुम्ही मला टाळत असाल आणि मग वेळ निघून गेल्यावर मला शहाणपणा शिकवायला याला तर ते मी का सहन करावे. आणि म्हणून जो गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र मैत्रीण असते. सुखाचे सोबती हजार असतात हो. पण, दुःखात आणि अडीअडचणीत जे साथ देतात तेच खरे आपले असतात. आणि म्हणूनच आपल्या माणसांसाठी वेळ काढायला शिका.. कारण ही आणि अशी वेळ उद्या तुमच्यावर सुद्धा येऊ शकते..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.