पूर्वी पंधरा पैशाच्या पोस्टकार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय पत्रात माणूस त्या पत्रांतील शब्दांमध्ये आपल्या आप्तस्वकियांचे चेहरे बघत होता. या पत्रांची आतुरतेने वाट पाहिली जायची व कधी आसू तर कधी हसू या भावना या पत्रांमुळे अनुभवायला मिळत होत्या..
पूर्वी लोक आपल्या माणसांची ख्याली खुशाली वाचून आनंदून जात होते. क्रांती आणि बदल हा मनुष्य स्वभाव आहे.. टेलिग्राम, टेलिफोन उदयास आले आणि मग ३ एप्रिल १९७३ रोजी मार्टिन कूपर या मोटोरोलाच्या इंजिनीअर ने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा हा मोबाईल एक किलो वजनाचा होता याला ब्रिक म्हणायचे.. प्रगती कधीही चांगलीच असते. मात्र तिचा अतिरेक माणसाला माणसापासून दूर घेऊन चालला आहे. कुठलीही गोष्ट एका मर्यादेत आणि नियंत्रणातच चांगली असते.. आज एका घरात राहूनही माणूस आपल्या रक्ताच्या माणसापासून दूर झाला आहे. सगळी कामे मोबाईलवर माणूस करीत असल्याने प्रत्यक्ष भेटीगाठी खूप कमी झाल्या आहेत..
समोरासमोर बसून आणि एकमेकांना भेटून सुख दुःखाबद्दल पूर्वी जसे आपण बोलत होतो तसे बोलणे आता खूपच कमी झाले आहे. आपल्या भाव भावना मरून आपण यंत्र झालेले आहोत. कुणी मेलं गेलं तरी आपल्यापैकी अनेक फक्त फोनवरच श्रद्धांजली वाहतो किंवा वाढदिवसाला सुद्धा फोनवरच शुभेछया देतो. एका घरात राहूनही आपण आपल्या माणसांशी संवाद साधायला कमी पडत आहोत. बहुतांश घरातले सर्व लोक एकमेकांशी बोलण्यापेक्षा मोबाईलवरच जास्त वेळ खर्च करीत आहेत. एकाचं तोंड इकडे तर एकाचं तिकडे.. माणूस माणसापासून तुटत चालला आहे.. आपल्याला एका गोष्टीची कल्पना नाही की, आपण आपल्या आयुष्यातील आपले कितीतरी महत्वाचे तास मोबाईल बघून टाईमपास करण्यात वाया घालवीत आहे.. महत्वाची माहिती बघणे वेगळे आणि आपले छंद, फिरणे इत्यादी इत्यादी सर्व गरजेचे टाळून आपण मोबाईल मध्ये स्वतःचे डोळे खराब करीत आहोत.. मोबाईलचा चांगल्या गोष्टींसाठी निश्चित फायदा घ्या. मात्र, हा फायदा घेतांना आपल्या अवतीभोवतीच्या मित्र मैत्रिणी आणि रक्ताच्या नात्यांशी नाळ तोडू नका.. आणि म्हणूनच असे म्हणावेसे वाटते आहे की, मोबाईल मुळे माणूस माणसापासून भावनिकदृष्ट्या दूर चालला आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.