मनातलं पान..
हल्ली माणसांना काय झाले आहे ठाऊक नाही.. रस्ता तोच आहे आणि तिथेच आहे आणि मीही तोच आहे तिथेच आहे. मात्र, आजूबाजूचे वातावरण मात्र रोज बदलते आहे. पण, मला आणि रस्त्याला बदलायला जमत नाही. आमच्या संपर्कात येणाऱ्या अगदी कुणालाही आम्ही त्यांना त्यांच्या हव्या त्या उद्दिष्टा पर्यंत न थकता पोहोचवतो. मात्र, आम्ही थकलोय की ताजेतवाने आहोत, आम्हाला काही समस्या आहेत काय हे विचारणारी, विचारणारे दुर्दैवाने अभावानेच मिळत आहेत.. इथला प्रत्येक व्यक्ती खूप बिझी असल्याचे सांगत आहे. मात्र, आपल्या माणसांसाठी पाच मिनिटे काढायला वेळ नाही एवढा या जगात कुणीच बिझी नसतो. भेटण्याची इच्छा असली की अगदी कसही सातासमुद्रापार जाऊन देखील भेटता येतं..
खूपशी माणसे वेळकाढू आणि गरजकाढू झालेली आहेत. स्पष्ट बोललेले लोकांना आवडतच नाही.. लोकांना फक्त त्यांची स्तुती ऐकायला आवडते. आणि हल्ली खूपशा लोकांच्या नाकावर नको तितका जास्त राग आहे. आपण एखाद्यासाठी शंभर चांगली कामे करा आणि एकदा काही स्पष्ट बोलले तर ती समोरची व्यक्ती आपण अगोदर त्यांच्यासाठी केलेली शंभर चांगली कामे विसरून लगेच तू कोण आणि मी कोण यावर उतरते.. मी माझ्या स्वभावानुसार समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचा आणि बदलत्या वागण्याचा, आपल्याला सतत टाळण्याचा अभ्यास करीत असतो. मी समोरच्याला खूप जास्त संधी देतो. कारण मला ठाऊक आहे मी जर कुणाला बाजूला टाकले तर पुन्हा कधीच त्या व्यक्तीला जवळ करीत नाही.. तुम्ही बदलले अहात, कसे वागत अहात हे काय मला कळत नाही काय ? पण बघू समोरचा किती बदलतोय हे मला बघायचे असते.
मी माझ्याकडून सहसा संवाद तोडत नाही.. दहादा फोन मेसेज करतो पण समोरच्याला त्याची जाणीवच नसेल तर मग.... मी हे जनरल बोलतोय बरे.. नाहीतर यावरूनही तुम्हाला राग यायचा.. स्पष्टच सांगायचे तर, रस्ता आणि मी तोच आहे.. आमच्या संपर्कात हजारो येतात जातात.. येतील जातील.. पण, आम्ही बदलत नाही, बदलणार नाही.. कारण आम्ही अनुभवाने परिपक्व झालेले आहोत.. तुमच्यातला बदल लगेच लक्षात येतो हो.. माणसे कमवायला शिका तोडायला नाही.. जे मला सोडून गेले ते स्वतःच्या मस्तीने आणि अहंकाराने गेले.. आणि म्हणूनच रस्ता एकाच जागी जरी पहुडलेला असला तरी त्याची नजर आणि कार्य चौफेर असते हे आपण विसरून कसे चालेल..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.