रेल्वे प्लॕटफाॕर्मवर दोन महिलांचा संवाद कानी पडला.... खरंतर हा ज्याचा त्याचा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे. पण समोरच्याशी ओळख न पाळख आणि काहीही संबंध नसतांनाही काही लोक मात्र सर्रास रिमार्क मारत असतात..
एक बाई आणि तिची मुलगी ट्रेनची वाट बघत होती.. ती मुलगी त्या बाईला सारखं म्हणायची मम्मी तू कितीवेळ मेकअप करीत राहिलीस म्हणून आपली आधीची ट्रेन मिस झाली इत्यादी इत्यादी.....
या दोघी मायलेकीं पासून अगदी थोड्याच अंतरावर दुसऱ्या दोन बाया बेंचवर बसलेल्या. त्यांनाही त्याच ट्रेनने जायचं होतं. त्या बायांच्याही कानावर या मायलेकींचा संवाद पडत होता.... त्या बाया एकमेकीं सोबत बोलू लागल्या....
पहिली बाई - मुलगी छान दिसतेय पण अगदी सिंपल आहे.
दुसरी बाई - आणि आई बघ किती नटलीय.. मुलीने टाॕप आणि जिन्सची पँट घातलीय.... शोभतेय तिला.. आणि आई बघ वनपीस घालून मिरवतेय.. बुढ्ढी घोडी लाल लगाम.... काय म्हणावं याला..
पहिली बाई - याला म्हातारचळ म्हणतात..
दुसरी बाई - या दोघींकडे पाहून असं वाटतंय की नव-याची गरज या मुलीला नाही तर हिच्या आईलाच जास्त आहे..... ( दोघीही हसतात.....)
पहिली बाई - आयांनीच असं कंबरेचं सोडून डोक्याला बांधलं तर मुलींना दोष देण्यात काय अर्थ आहे..
दुसरी बाई - या म्हाताऱ्याच अशा चळल्या सारख्या वागतात म्हणून यांच्या मागे अठरा अठरा वर्षांची मुलं लागतात.....
( मला खूप वाटलं मधे बोलावं की अहो चांगलं टाप टीप राहणं हा गुन्हा आहे का..... पण म्हटलं आपण उगीचच या बायांच्या संवादात तोंड घालण्यात अर्थ नाही..)
पहिली बाई - या बाया अशा ताळतंत्र सोडून वागतात राहतात म्हणून यांच्या मागे कुणीही लागतं.. अहो वागण्या बोलण्या चालण्यातून आणि कपडे घालण्यातूनच संस्कार कळतात..
दुसरी बाई - स्त्री असो अथवा पुरूष त्याने आपल्या वयानुसारच वागावं. हे असं गर्भश्रीमंत राहिले वागले तर खपून जातं हो. पण आपल्या सारख्या मध्यमवर्गीय लोकांना हे कससच वाटतं..
( दरम्यान ती बाई सतत मोबाईलच्या स्क्रिनवर स्वतःचा चेहरा पहायची.. बहुदा तिला तिच्या मेकअपची चिंता वाटत असावी..)
पहिली बाई - मुलींच्या आधी या अशा आयाच बाॕयफ्रेंड बरोबर पळून जातील..
दुसरी बाई - अगं पळण्याची गरजच काय पिकनिक किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या नावाखाली तोंड काळं करून येत असतील.... ( पुन्हा दोघीही हसतात......)
पहिली बाई - नवरा आणि मुलांना फसवून काय मिळत असेल यांना.. ?? ( आता दोघीही गंभीर होतात अगदी शांत बसतात.. ट्रेन येते..... लोकांची डब्यात चढण्याची आणि डब्यातून खाली उतरणा-यांची लगबग वाढते.. मी जेन्ट्स डब्यात शिरतो..... कुणाला यातून जो काही बोध घ्यायचा तो त्याने घ्यावा.. शेवटी ज्याचं त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे. आणि कुणी काय करावं काय घालावं काय बोलावं आणि कसं जगावं हे ठरवणारे आपण कोण आहोत. खरंतर कुणीच नाही. जगण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे.. मात्र तरीही दिवसभर डोक्यात एकच शब्द त्या बाईने अगदी सहजगत्या उच्चारलेला घुमत राहिला ..... म्हातारचळ....)
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.