मनातलं पान..
आपल्या अवतीभोवती अशी खूप सारी माणसे असतात किंवा आपण ज्यांना मित्र मैत्रिणी म्हणतो असे लोक असतात. पण यातील फार कमी लोक आपल्या अडचणीला धावून येतात. आणि बहुतांश आपल्याला काय करायचे आहे असे मनातल्या मनात म्हणून फक्त काठावरून आपली गंमत बघत राहतात. हे लोक आपल्या तोंडावर प्रचंड गोड बोलतात पण आपल्या अडचणीला कधीच धावून येत नाहीत. आणि जेव्हा यांना काही समस्या उद्भवते तेव्हा मात्र यांना आपली आठवण येते. आणि आपण किंवा इतर कुणी यांना मदत केली नाही तर मग यांना खूप राग येतो. मित्रांनो राजा असो अथवा भिकारी कुठली ना कुठली गरज आपल्या प्रत्येकालाच लागत असते. आणि म्हणून किमान आपल्या संपर्कातील आणि चांगल्या ओळखीतील लोकांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे. वेळ निघून गेल्यावर तुमची सहानुभूती काहीच कामाची नसते. काही मंडळी रोज आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्यावर बारीक लक्ष ठेऊन असतात. पण, या व्यक्ती आपण चांगले करतोय की वाईट करतोय या बद्दल चाकर शब्दाने बोलत नाहीत. खरेतर या अशाच व्यक्ती काठावरून गंमत बघणाऱ्या असतात. म्हणून अशा व्यक्तींच्या संपर्कात राहण्यात काहीच अर्थ नसतो. आपल्याला जमेल तेवढी मदत केल्याने आपण लहान होत नाही हे कायम लक्षात ठेवा असे सांगावेसे वाटते..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.