शेवटची पिढी..

मनातलं पान.. 

जगण्यासाठीची अत्यावश्यक गरज म्हणा, स्वप्नपूर्तीचा ध्यास म्हणा, शहराचे आकर्षण म्हणा, शहराबद्दलच्या भ्रामक खऱ्या खोट्या समजुती म्हणा किंवा इतर काहीही म्हणा. मात्र, आज खेड्यांमध्ये जे ज्येष्ठ उरले आहेत ती कदाचित खेडेगावात असलेले शेवटची पिढी असेल किंवा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वप्न बघायलाच हवीत आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत सुद्धा करायला हवी. मात्र, सणासुदीला नाहीतर काही बरे अथवा वाईट घडल्यास गावाला जाणारे चाकरमानी, त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले त्यांचे वृद्ध आई वडील आणि ही मुले पुन्हा शहरात निघाल्यावर त्या आई वडिलांचे पाणावलेले डोळे.. हे सर्वच फार वेदनादायी आहे असे तुम्हाला वाटत नाही काय ?? खूपशी गावातील मंडळी कोरडवाहू जमीन असल्याने, कर्ज झाल्याने, गावात रोजगार नसल्याने, कसायला जमिनीचा पुरेसा तुकडा नसल्याने गावाला पारखी होऊ लागली आहेत. आणि केवळ आठ दहा अथवा पंधरा हजारांसाठी  हे अकुशल लोक शहरात मरण विकत घ्यायला येतात. धड राहण्याची सोय नाही, कसेतरी कुत्र्या मांजरासारखे जगायचं..आयुष्याची किमान पाच - दहा वर्ष कमी करून घ्यायची..  घड्याळाच्या काट्यावर आणि रेल्वे, बेस्ट बसेसच्या टायमिंगवर आपल्या रोजच्या जगण्याचे वेळापत्रक आखायचं..  जे मोठ्या पगाराच्या जॉब ला आहेत त्यांचा प्रश्न  नाही मात्र जे गरीब आणि सर्वसाधारण नोकरीला आहेत हे त्यांच्यासाठी बोलतोय. मुंबई कुणाला उपाशीपोटी निजवत नाही हे जरी खरे असले तरी इथे खर्च सुद्धा खूप आहेत. गरीब माणसाला स्वतःसाठी पैसे वापरून गावाला सुद्धा पैसे पाठवावे लागतात. मी नेहमी माझ्या व्याख्यानांत आणि आर्टिकल मध्ये सातत्याने म्हणत आलोय की ज्यांची गावी परिस्थिती थोडी जरी बरी असेल त्यांनी शहरात धकाधकीचे आयुष्य जगायला येऊच नये.

उच्च शिक्षण, आरोग्य यासाठी येणे ठीक आहे. पण,  सरकारने खेड्याच्या विकासासाठी भारत स्वतंत्र झाल्यापासून कितीतरी रोजगार योजना निर्माण केल्या आहेत. वातावरणानुसार शेती, शेळ्या मेंढ्या, गायी म्हशी पालन, कुक्कुटपालन आणि महिला पुरुषांसाठी, कुटुंबांसाठी अनेक छोटे व्यवसाय, गृहउद्योग सरकार देत आहे. पण, बहुतांश लोक याकडे वळताच नाहीत. गावचं मोकळं वातावरण, गावची माणुसकी शहरात अभावानेच पाहायला मिळते. करायचं म्हटलं तर काहीही करता येतं. मात्र, त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मानसिकता हवी आहे. मराठी माणूस नेहमीच व्यवसाय करायला लाजतो आणि इतर प्रांतातले लोक व्यवसाय करून आपल्या पगाराच्या चौपट पैसे कमवतात. जर अजूनही आपण  धडा घेतला नाही तर आपल्या, जमिनी, घरे असे एक एक करून गावी कुणीच नाही म्हणून आपण सगळं विकून टाकू.. आणि त्यात आपल्या शेवटच्या पिढीतील गावाकडचे आजी आजोबा, आई वडील संपले की आपलं गाव सुद्धा अगदी कायमचे संपेल. जागे व्हा अजूनही वेळ गेलेली नाही.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

64

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.