लोहमार्ग पोलीस भरतीत जिल्ह्यात तिसरी आलेल्या नेहाचा शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव आणि शब्द खड्गचे कॅमेरामन दिनकर सोमासे यांनी शाल व पेढे देऊन सत्कार केला..
मेहनती माणसाला काहीच अशक्य नसते याची साक्ष डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव येथे राहणाऱ्या लक्ष्मण उशिरे यांनी पटवून दिली आहे. डोंबिवलीच्या पेंढरकर कॉलेजात बीए फायनलला असलेली नेहा लक्ष्मण उशिरे ही अत्यंत मनमिळाऊ आणि अभ्यासू मुलगी. उशिरे यांचे पाच लोकांचे कुटुंब. ते स्वतः त्यांची पत्नी जया आणि मुले साहिल, समीर आणि नेहा.. या पाच जणांचे कुटुंब रिक्षावर पोसणे त्यात मुलांचे शिक्षण, खाणे पिणे आणि इतर दैनंदिन व्यवहारातील गोष्टी पुरविणे तितकेसे सोपे नाही. मात्र आपल्या वडिलांच्या मेहनतीची नेहाला जाणीव असल्याने तिने जीवाचे रान करून लोहमार्ग पोलिसांत स्वतःचे स्थान पक्के केले. कुटुंबाला आधार मिळावा म्हणून उशिरे यांच्या पत्नी जयाताई या सुद्धा डोंबिवली पश्चिमेत असलेल्या स्पंदन हॉस्पिटल मध्ये कामाला जाऊ लागल्या. दोन मुले समीर आणि साहिल यांनाही आपले आई वडील करीत असलेल्या मेहनतीची पूर्ण जाणीव असल्याने ही मुले सुद्धा रिक्षा असो अथवा ट्रम्पेट वादन असो आपल्या वडिलांना मदत करू लागली. नेहाचा मोठा भाऊ ज्याने नेहाचा पोलीस भरतीचा सराव करून घेतला. हा मोठा भाऊ सुद्धा पोलीस भरतीची तयारी करीत आहे. हे कुटुंब मूळचे मालेगाव नाशिक येथील आहे. पोटापाण्यासाठी लक्ष्मण उशिरे यांनी मुंबईची वाट धरली.
नेहाच्या यशात तिची स्वतःची जिद्द आणि मेहनत जरी असली तरी तिला तितकीच समर्थ साथ आणि आत्मविश्वास दिला तो तिचे आई वडील आणि तिच्या दोन भावांनी.. नेहाला उच्च शिक्षण घेऊन पोलीस अधिकारी व्हायचं आहे. शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र नेहमी मेहनती आणि प्रामाणिक माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते . नेहा आणि तिचे रिक्षाचालक वडील लक्ष्मण उशिरे यांच्या बद्दल शब्द खड्ग चे संपादक प्रा. दिपक जाधव यांना शब्द खड्ग परिवारातील निलेश गायकवाड आणि दिनकर सोमासे यांनी माहिती दिली. आणि म्हणून शनिवार 2 मे 2026 रोजी नेहा उशिरे हिच्या घरी जाऊन शब्द खड्ग तर्फे नेहाचा शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव आणि शब्द खड्गचे कॅमेरामन दिनकर सोमासे यांनी शाल व पेढे देऊन सत्कार केला.. या सत्काराने उशिरे कुटुंब खूप भारावून गेले आणि त्यांनी प्रा. दिपक जाधव आणि दिनकर सोमासे यांचा आमरस पुरी खाऊ घालून पाहुणचार केला.. नेहाला शब्द खड्ग परिवारातर्फे तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.