मनातलं पान..
भूक प्रत्येकाची कमी ज्यास्त प्रमाणात पोटाची, शरीराची आणि मनाची सुद्धा.. हल्ली ज्याला ही भूक जिथे कचाट्यात सापडेल तिथे तो तिचा करकचून समाचार घेतो..
भुकेपुढे सर्व तत्वज्ञान कुचकामाचे असते.. उपाशीपोटी लष्कर सुद्धा लढू शकत नाही.. उपदेशाचे डोस उपाशी पोटाला मुळीच कळत नाहीत..
कधी कधी माणूस गुऱ्हाळातल्या ऊसासारखा चिप्पाड आणि अक्षरश: रक्ताचा घाम गाळणारा असला तरी पोटभर खायला मिळत नाही.. भुकेल्या पोटासाठी खूपदा लोक आपले गाव आणि राज्य सोडतात..
तुटक्या घराच्या आडाला लटकलेल्या मंद प्रकाश देणाऱ्या दिव्या सारखंआयुष्य रस्त्यावर जळत राहतं.. आणि अशी भूक सोबत घेऊन फिरणारी माणसे सूर्य ओकणा-या तडकणा-या किरणांना आणि वाऱ्याला स्वतःच्या नशिबाला बांधू पाहतात..
क्षीण बरगड्यांच्या आत उसासे घेत रोजच तेच ते उसवून शिवलेल आयुष्य न हार मानता गरीब जगत राहतात.. मात्र, तरी ओघळतात नशिबाची नाणी रोज आणि मांडला जातो भुकेचा बाजार आणि आणि लावली जाते देहाची बोली.. जर भूकच नसती तर किती चॅन झाले असते ना.. पण दुर्दैवाने नशिबाने या सृष्टीला अगदी वारेमाप भूक बहाल केली आहे.. खरेतर प्रत्येकाने आपल्या ताटात मावेल इतकाच घास खायला हवा. पण, पूर्वापार अगदी सगळ्याच बाबतीत माणसाची भूक वाढलेली आहे व सर्व काही मिळालं तरी ही भूक काही केल्या कमी होतच नाही.. खूपदा आपण आपल्या गरजा नाहक वाढविल्याने माणूस बांधलाय गरजेच्या चाकांना.. आणि उपाशीपोटी स्वप्नं सुद्धा भुकेचीच आणि भाकरीचीच पडतात.. आणि म्हणूनच ज्यांच्या ताटात अगदी सांडून चाललंय त्यांनी आपल्या घासातला अर्धा घास गोरगरीब आणि गरजवंतांना दिल्यास थोड्या प्रमाणात का होईना पण भुकेचा प्रश्न सुटेल..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.