सविस्तर वृत्त असे की, डोंबिवली पश्चिमेतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व जवळच असलेल्या हनुमान मंदिर परिसरात सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकी, चारचाकी गाड्या व रिक्षांमुळे रास्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही वाहनचालकांना सांगून सुद्धा ते वाहने सावकाश चालवा सांगणाऱ्या पादचारी व पालकांशी हुज्जत घालीत. या सर्वांना चाप बसावा म्हणून डोंबिवली वाहतूक पोलिसांनी सदरची कारवाई केल्याने वाहतूक पोलिसांचे पालकांनी स्वागत केले आहे..
शाळा सुटण्याच्या वेळी दुपारी १२ ते १ आणि संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत परिसरात विद्यार्थी, पालक आणि वाहनांची मोठी गर्दी होत असते. अशा गर्दीच्या वेळी काही वाहनचालकांकडून वेगाने तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहने चालवली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
ही बाब लक्षात घेता या परिसरात वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कारवाईदरम्यान अनेक पालकांनी पोलिसांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारचा बंदोबस्त आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
शाळा सुटण्याच्या वेळेत कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी
दुपारी आणि संध्याकाळी शाळा सुटण्याच्या महत्त्वाच्या वेळेत वाहतूक पोलिसांनी नियमित उपस्थित राहून वाहतुकीचे नियोजन करावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना सुरक्षितता मिळेल तसेच पालकांची आणि वाहनचालकांची होणारी गैरसोयही कमी होण्यास मदत होईल..
शाळा, महाविद्यालये, दवाखाने, रास्ता चौफुले इत्यादी महत्वाच्या ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्याचा नियम आहे मात्र काही वाहनचालक हा नियम पाळीत नाहीत व त्यामुळे अपघात घडतात. आणि म्हणूनच फक्त वाहतूक पोलीस, पादचारी, शिक्षक आणि पालकांच्या सूचनांवर अवलंबून न राहता वाहनचालकांनी सुद्धा नियमांचे पालन करावे व स्वतःची आणि विद्यार्थी तथा इतरांची सुरक्षा किती महत्वाची असते याचे भान ठेवावे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.