आज व्यवसाय असो, अभिनय असो, एखादी हटके नोकरी असो किंवा आपले छंद जोपासणे असो; केवळ लोक काय म्हणतील या भीतीने अनेक जण आपल्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्नांना मुरड घालत आहेत. विशेष म्हणजे ही भीती केवळ तरुणांमध्येच नाही, तर चाळिशी ओलांडलेल्या स्त्री-पुरुषांमध्येही दिसून येते..
मात्र गंमत अशी की, आपल्यावर टीका करणारे लोक स्वतःच्या आयुष्यात मात्र मनाप्रमाणे जगत असतात. त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्याचा विचार करून स्वतःच्या आनंदाचा बळी देण्यात काहीच अर्थ नाही. आयुष्य एकदाच मिळते आणि तेही खूप मर्यादित आहे. मग समाजाच्या भीतीने स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करण्यापासून स्वतःलाच का रोखायचे?
एरव्ही चित्रपटातील अभिनेत्री किंवा राजकीय नेत्यांवर टीका करणारे लोकच मोठ्या कार्यक्रमांत त्यांचा सन्मान करताना दिसतात. यावरून एकच लक्षात घ्या, लोकांचे मत परिस्थितीनुसार बदलत असते. त्यामुळे लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय करू इच्छितो, याला अधिक महत्त्व द्या.
दुसऱ्यांचे वाईट न करता, कोणाचेही नुकसान न करता स्वतःच्या अटींवर जगा. टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि मनातील स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याचे धाडस दाखवा. कारण आयुष्य तुमचे आहे, स्वप्ने तुमची आहेत आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारीही तुमचीच आहे!
— प्रा. दिपक जाधव.. संपादक, शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.