शब्द खड्ग रोखठोक..
जग कुठे चाललंय आणि आपल्या भारत देशाला काही जातीयवादी मंडळी कुठे घेऊन चाललीय हे पाहून आपण किती मूर्ख आहोत याची साक्ष पटते. जातीधर्माच्या खुळचट कल्पना आणि जोखडात आपल्याला पुन्हा एकदा काही मंडळी जुंपत आहेत. देव नावाची भीती दाखवून आणि धर्माचे नाव सांगून बहुजनांचे शोषण केले जात आहे. समाजसुधारक वस्तुस्थिती सांगून मेले. पण, तरी आपण अजूनही सुधरत नाही ही शोकांतिका आहे.. राज्यकर्ते सर्वसामान्यांची प्रगती, विज्ञान, शिक्षण आणि एकूणच जीवनमान उंचाविण्या पेक्षा देव, धर्म यातच आपल्याला झुंजवीत आहेत.. जो स्वतः कडीकुलुपात राहतो आणि ज्याचे कळस व देव्हारे त्याच्या डोळ्या देखत लुटले जातात, जो स्वतःचे रक्षण करू शकत नाही तो आपले रक्षण करणार काय ? हेही सर्वसामान्यांच्या अजूनही लक्षात येत नाही..
अरे अजूनही अंधश्रद्धा सोडा आणि माणसा माणसांत देव शोधा, माणुसकीचे मळे फुलवा. देव धर्माच्या, मंदिरांच्या आणि नागड्या साधूंवर नागरिकांच्या कररुपी पैशातून करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा तेच पैसे देश आणि जनतेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खर्च करा.. कुणी पाहिलंय स्वर्ग नरक आहे की नाही ते.. आपण शिक्षित झालो असल्याने आता डोळस बनून मानवतेचा विचार करावा आणि तना - मनात मानवता रुजवावी.. या त्या राजकीय पक्षाच्या नादी लागून आत्मनाश करण्यापेक्षा स्वतःच्या आणि मानवतेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा.. आणि कधीच न भेटणाऱ्या देवाच्या भानगडीत न पडता स्वतः स्वतःतील स्वतःला शोधा आणि जगण्याचा आनंद घ्या.. असे केल्यानेच आपल्या आयुष्यात नवीन पहाट उगवेल..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.