शिक्षकांना वाली उरला नाही..

शिक्षकी पेशा अतिशय नोबल पेशा म्हणून ओळखला जातो.. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आणि विद्यार्थ्याला माणूस म्हणून घडविण्यात जसे माता पिता आणि समाज कारणीभूत आहे तसेच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक शिक्षिका मंडळींचा सिंहाचा वाट असतो..

मात्र, आज जनगणना असो, मतदार नोंदणी असो, निवडणुकांची आणि इतर सरकारी कुठलीही कामे असोत, आता नव्याने आलेले SIR चे काम असो अगदी सगळीकडे शिक्षकांना परिपत्रक काढून पाठविले जाते. शाळा सरकारी अनुदानित असो अथवा वीणा अनुदानित असो शिक्षकांना स्थानिक नगरपरिषद, महानगरपालिका अथवा  इतर सरकारी यंत्रणा कामाला जुंपतात. बरे हे न केल्यास त्याला राष्ट्रीय गुन्हा म्हटले जाते व नकार देणाऱ्या शिक्षकांनी या कामाला नकार देण्याचे समर्पक कारण दिले नाही तर त्यांची नोकरी सुद्धा जाऊ शकते. सर्वसामान्य लोकांची मानसिकता ही आहे की, शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या भरपूर पगाराच्या मानाने त्यांना कमी काम असते. ते काय फक्त मुलांना शिकवितात इत्यादी इत्यादी.

मात्र प्रत्यक्षात शिक्षकांना किती काम असते हे शिक्षक झाल्या शिवाय कळणार नाही. अधिकारी सरळ परिपत्रक काढून मुक्या जनावरांप्रमाणे या शिक्षकांना हाकीत आहेत. व अधिकाऱ्यांना विचारल्यावर ते सनदी अधिकारी आणि राज्यकर्त्या सरकारकडे बोट करतात. अर्थात अधिकाऱ्यांची काही चूक नाही त्यांना वरून जसे आदेश येतात तसे वागावेच लागते.

शिक्षकांचे काम शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्याचे आहे. पण होतं काय तर शिक्षकांना सरकारी अतिरिक्त कामाला जुंपले जाते. यासाठी सरकारने सुशिक्षित बेरोजगारांना नेमावे म्हणजे त्यांनाही किमान काही काळ रोजगार प्राप्त होईल अशी मागणी वारंवार शिक्षक युनियनने केलेली आहे. शिक्षकांवरील हा सरकारी अतिरिक्त कामाचा बोजा लादू नये म्हणून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या युनियनने वारंवार संप, मोर्चे काढलेत सरकार दरबारी निवेदनं देत आहेत, उपोषणे करीत आहेत मात्र सरकार याकडे विशेष लक्ष देत नाही.

जर शिक्षकच अतिरिक्त कामाच्या बोजाने मनातून नाराज असेल तर तो विद्यार्थ्यांना काय शिकविणार हा खरा प्रश्न आहे. म्हणून शिक्षकांवर लादलेले हे सरकारी अतिरिक्त कामाचे जोखड उतरवावे व शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करू द्यावे असे शिक्षण क्षेत्रातील जाणकार, पालकवर्ग आणि काही सेवानिवृत्त शिक्षक यांचे म्हणणे आहे..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

62

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.