पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या अति दिखाव्यात कार्यकर्ते भरडले जात आहेत आणि हेच कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैवी आहे..
आज भारतातील कुठलाच अगदी कुठलाच नेता आणि पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही. ज्याचे पाय धरावेत या लायकीचा सुद्धा एकही नेता नजरेत नाही. सत्तेचे राजकारण आणि पैसा या भोवतीच विविध पक्ष आणि नेते घुटमळत आहेत. पब्लिकली एकमेकांना शिव्या घालणारे सर्वपक्षीय नेते रात्री त्यांच्या गरजेनुसार एकमेकांशी जुळवून घेत असतात. फक्त कार्यकर्ते आणि लोकांना मूर्ख बनविण्यासाठी हे लोक एकमेकांशी भांडतात. पण प्रत्यक्षात स्वतःच्या स्वार्था साठी ही सर्वपक्षीय नेते मंडळी आतून मात्र एकच आहेत.
सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात सर्वपक्षीयांनी हजेरी लावली. पवार कुटुंबीय सेक्युलर आहे हे जरी मान्य केलं तरी एरव्ही त्यांचे राजकारण मराठा समाजाभोवती फिरते. पण पवारांनी सुप्रिया यांना सीकेपी सुळेंच्या घरात दिले आणि रेवती म्हणजे सुप्रियांची मुलगी तिचा नवरा सारंग लखानी सिंधी समाजाचा. आपल्याला इथे सामाजिक राजकारण करायचं नाही. मात्र, हे मोठे लोक जिथे सत्ता आणि बडेजाव तथा पैसा असेल तिथे जात धर्म बासनात गुंडाळून ठेवतात. एरव्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने गळा काढणारी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस फडणवीसांनीच रेवतीला सारंग लखानी यांचे मागणे आणले हे लोकांना सांगेल काय ? आणि हे लग्न ठरल्या बरोबर सारंगच्या कंपनीला फडणवीसांनी पाच हजार कोटी आणि पुढे समथिंग असे कंत्राट दिले. सारंगचे वडील अरुण लखानी यांना भाजपचे खासदार केले.
कार्यकर्ते आणि मतदार इतके महामूर्ख आहेत की पक्षनिष्ठेपोटी एकमेकांची डोकी फोडतात आणि एकमेकांचे अगदी कायमचे हाडवैरी होतात आणि ही नेते मंडळी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी रात्रीत एकमेकांशी मांडवली करतात. कार्यकर्ते आयुष्यभर नेत्यांसाठी चटयाच अंथरत राहतात आणि हे नेते जाती धर्माच्या, हिंदुत्ववादाच्या नावाखाली कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवून एकमेकांची डोकी फोडायला भाग पाडतात. कार्यकर्त्यावर पोलीस केसेस होतात आणि कार्यकर्त्यांची आयुष्य उध्वस्त होतात. आपल्याला मराठीचे मोठेपण सांगणाऱ्या नेत्यांची मुले स्कॉटिश स्कुल मध्ये शिकतात. परदेशात जातात तिथे कंपनी खोलतात नाहीतर भारतात येऊन थेट मंत्री संत्री बनतात. आणि हे नेते इतर सर्वसामान्य कार्यकर्ते आणि गरिबांच्या मुलांना भांडायला जाती पातीच्या, धर्माच्या, हिंदू - मुसलमानांच्या लढाया लढायला रस्त्यावर उतरवितात. या नेत्यांची मुले कधी रस्त्यांवर दंगली करायला उतरत नाहीत. कार्यकर्त्यांनो अजूनही जागे व्हा आणि या गेंड्याच्या कातडीच्या नेत्यांच्या मागे न लागता नोकरी धंद्यांच्या मागे लागा. जात, धर्म, देव इत्यादी इत्यादी आता बाजूला ठेवा आणि मानवता धर्म , संविधान तथा लोकशाहीचा विचार प्रत्यक्ष आचरणात आणून स्वतःची प्रगती करा..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.