हल्लीचे राजकारण इतक्या खालच्या पातळीला गेलेले आहे की अगदी सतत हिंदू मुस्लिम आणि देव धर्मावरून सर्वसामान्यांना लढवून स्वतःची राजकीय पोळी भाजली जात आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नाही पण, काळ सोकावतोय याचं आहे..
विशेष म्हणजे नेहमी प्रमाणे जो सुशिक्षित आणि बुद्धिजीवी वर्ग आहे त्यातील अपवाद वगळता फार मोठा वर्ग शेपूट घालून बसला आहे. आपल्याला काय करायचे आहे हा विचार करीत हा स्वतःला अतिशहाणा समजणारा वर्ग अजिबात कुठल्याच बाबतीत स्पष्टपणे व्यक्त होत नसल्याने कुणीही गल्लीतले आंडूपांडु अशिक्षित गुंड आपल्यावर राज्य करीत आहेत. कार्ल मार्क्स यांनी धर्माला अफूची गोळी म्हटले आहे. ते आजही तंतोतंत खरे आहे. कधीच आणि कुणासाठीच धावून न आलेल्या देवाची भीती घालून हजारो वर्ष विशिष्ठ वर्ग बहुजनांचे बारा वाजवीत आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांत सांगायचे तर माणूस चंद्रावर मुतून आला तरी आम्ही अजूनही अंधश्रद्धा कुरवाळीत बसलो आहोत.. गझनीच्या महंमदाने सोमनाथ मंदिरावरचे सोन्याचे कळस कापून नेले तेव्हाही देव आला नाही. ज्या मुलींवर अत्याचार होतात त्या देवाचा धावा करतात तेव्हाही देव कधीच धावून येत नाही. पण, याच देवाच्या नावावर जो देव स्वतःची रक्षा करू शकत नाही आणि कडी - कुलुपात पुजाऱ्याच्या देखरेखीत राहतो त्याचे स्तोम माजविले जात आहे. पुन्हा सर्वसामान्यांना हजारो वर्ष मागे घेऊन जाण्याचा भाजपचा डाव आहे. हिंदू खतरेमे म्हणणारा भाजप स्वतः सत्तेवर आहे व इतर समाज फक्त तीस पस्तीस टक्के मुश्किलीने आहे. भाजप लोकांची दिशाभूल करीत आहे. आणि जो देव स्वतःची मदत करू शकत नाही तो तुमची काय मदत करणार ? असे विज्ञानवादी आणि वास्तववादी लोक म्हणत आहेत ते काही खोटे नाही. पण, आपल्या बुद्धीवर देवाची, स्वर्ग नरक यांची भीती रुजविली गेल्याने एका विशिष्ठ वर्गाचे उखळ पांढरे होत आहे.
मंदिरे उभारण्या पेक्षा शाळा, कॉलेजेस, दवाखाने, रस्ते, पाणी, वीज, रोजगार आणि निवारा तथा अन्नपाण्याचा प्रश्न सरकारने सोडवायला हवा. भाजपने इतकी महागाई वाढवून ठेवलेली आहे की, सर्वसामान्य यात भरडून निघत आहेत. मात्र, हे फक्त गोदी मीडिया आणि अंधभक्त यांनाच दिसत नाही. आता 2029 ला येणाऱ्या निवडणुकांची वाट न बघता जेन झी सोबतच लोकशाही आणि संविधानाला मानणाऱ्या सर्वपक्षीय असंतुष्टांनी एकत्र येऊन भाजपची जातीयवादी, हुमुशाहिचे उद्दात्तीकरण करणारी आणि सर्वसामान्यांना सर्वच बाबतीत खड्डयात घातलेली जुलमी तथा पैसे, ईव्हीएम, ईडी, सीबीआय, पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून देशाला वेठीस धरलेली सत्ता नेस्तनाबूत करण्याची वेळ आली आहे. जागे व्हा अजूनही वेळ गेलेली नाही.. अंधश्रद्धेत गुरफटण्यापेक्षा वास्तववादी आणि मानवतावादी विचार करा..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.