तब्बल पंधरा ते सोळा दिवस अगोदर वरून राजाने हजेरी लावल्याने महाराष्ट्रभरात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आपण पाहत असतांनाच कल्याण - डोंबिवली शहरांत आज बुधवार २८ मे २०२५ रोजी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चांगलीच त्रेधा उडाली. पाऊस खूपच मुसळधार असल्याने छत्री शिवाय बाहेर पडलेल्या लोकांची पूर्ती वाट लागली.
डोंबिवली स्टेशन परिसराला तर तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. खबरदारीचा उपाययोजना म्हणून काही काळ वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. या संदर्भात पावसात चिंब भिजलेल्या अनेक डोंबिवलीकरांशी संवाद साधला असता.. संपूर्ण शहरभरात अनेक ठिकाणी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे सुरु असल्याने खूप ठिकाणी रस्ते खोदलेले असल्याने चाकरमानी आणि रिक्षावाले अगोदरच मेटाकुटीला आलेले आहेत. त्यात मुसळधार पावसाच्या पाण्याला मातीत मुरायला जागाच न राहिल्याने आणि सगळीकडे डांबर, काँक्रीटचे रस्ते झाल्याने तथा गटारांची सफाई प्रॉपर न झाल्याने जबरदस्त पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. केडीएमसीचे नवे आयुक्त आणि जुने जाणते अधिकारी तथा समाजसेवक आणि नगरसेवक काय करतात याकडे लोकांचे लक्ष लागून असल्याचे आणि वेळेत कधीच कामे केली जात नसल्याची खंत अनेकांनी बोलून दाखविली. अजून तर खरा पावसाळा सुरु व्हायचा आहे आत्ताच ही अवस्था तर जून जुलै मध्ये कल्याण डोंबिवलीत छोट्या लाईफ बोटी घेऊन फिरावे लागेल अशा खोचक प्रतिक्रिया अनेक लोकांनी व्यक्त केल्या. लोकांच्या करातील पैसे आणि सरकारी फंड कुठे आणि कसा वापरला जातो हे काय आम्हाला माहिती नाही काय असे लोक रागाने बोलतांना दिसले. तर, या शहरांतील नव्वद टक्के बांधकामे आणि डागडुजी केलेली कामे वर्षभर सुद्धा तग धरीत नसल्याची खंत अनेकांनी बोलून दाखविली. राजकीय पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांचे पाय खेचण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना लोकांची गैरसोय होत असल्याचा विसर पडत असल्याच्या संतप्त भावना लोकांनी व्यक्त केल्या आहेत..कल्याण डोंबिवलीचे मे महिन्याच्या अवकाळी पावसात आत्ताच इतके हाल होत आहेत तर कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेने पावसाळ्यासाठी केलेल्या नियोजनाचे काय.. खरे तर हा खरा प्रश्न आहे.. आणि रेल्वे ट्रॅकचे विचाराल तर त्यांची ही अवस्था या पेक्षा वेगळी नसल्याने लोकल ट्रेनने प्रवास करणारे प्रवाशी धास्तावल्याचे चित्र दिसले..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.