काय घेऊन आलोय आणि काय घेऊन जाणार आहे या वास्तवाची ज्याला जाणीव आहे तो सगळ्यांशी हसून खेळून आणि मोकळ्या मनाने राहतो. आणि जो अतिशय आतल्या गाठीचा असतो तो तोंडावर गोड गोड बोलतो मात्र मनातून अतिशय कपटी असतो..
ही अशी खोट्या प्रवृत्तीची माणसं त्यांचा कार्यभाग उरकला की आपल्याला टांग देऊन पळून जातात. यांच्या मानत खूप पाप असतं. ही माणसं फक्त स्वतःपुरतीच जगतात. ही यांच्या रक्ताच्या माणसांची होऊ शकत नाहीत तर तुमची आमची काय होणार हो. आतल्या गाठीची माणसं पटकन त्यांचं मत मांडत नाहीत. मग तुम्ही त्यांच्या कितीही जवळचे असा. मनात प्रचंड स्वार्थ भरलेला असल्याने हे लोक फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतात. हे लोक इतरांना पुढे येऊ देत नाहीत. सगळीकडे फक्त स्वतःच मिरवायला पाहतात. अशी लोकं आपल्याला वेळीच ओळखता यायला हवीत नाहीतर आपलं खूप नुकसान होतं. आर्थिक नुकसानी पेक्षा भावनिक आणि मानसिक नुकसान कधीच भरून निघत नाही. ही माणसं कमालीची संशयखोर असतात. यांचा स्वतःवर सुद्धा विश्वास नसतो तर तुमच्यावर हे काय विश्वास ठेवणार. ही लोकं स्वतः खोटी असल्याने ती आपल्यालाही त्यांच्या सारखंच खोटारड समजतात.
या उलट मोकळ्या मनाची माणसं रोखठोक असतात ती मनात कुढत बसत नाहीत, कितीही समस्या असल्या तरी ही माणसं सदैव हसतच असतात आणि विनाकारण कुणावर राग सुद्धा धरत नाहीत. जे काही आहे ते रोखठोक स्पष्ट समोरासमोर बोलतात. ताकाला जाऊन भांडं लपवणं मोकळ्या मनाच्या माणसांच्या स्वभावात नसतं. हे लोकं स्वतःपेक्षा जास्त यांच्यावर विश्वास असलेल्यांना आणि यांच्या सोबत असलेल्यांना गाजवतात. मदतीला सदैव तत्पर असतात अशी माणसं. मुह मे राम और बगल मे छुरी.. असा यांचा स्वभाव नसतो. मैत्रीत, प्रेमात आणि माणुसकीत ही माणसं एक नंबर असतात. ही माणसं कुणाला दगा देत नाहीत. आणि म्हणूनच यांच्याशी कुणीही गद्दारी केली तरी यांना फरक पडत नाही. कारण यांच्या दिलदार स्वभावाने यांना नवनवीन माणसं भेटतच जातात. आतल्या गाठीच्या लोकांनाही नवी माणसं भेटतात. पण, ही नवी माणसं यांच्या सारखीच असल्याने यांचा गैरवापर करण्याचाच विचार करतात. तात्पर्य काय तर आपण माणसं ओळखायला शिकायला हवं कारण सगळेच आपल्या सारखे चांगले नसतात..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.