खूपदा आपण आपल्या आयुष्यात माणसांची खोगीरभरती करून ठेवलेली असते. या पैकी किती लोक प्रत्यक्षात आपली वाईट वेळ आल्यावर आपल्या मदतीला येतात हा संशोधनाचा विषय ठरेल. जे आपल्या जीवाला जीव देतात व व्यस्त असतांनाही आपली आठवण काढतात आपल्यासाठी वेळ काढतात अशाच लोकांसाठी आपणही वेळ काढायला हवा. माणसं तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. पण, दुर्दैवाने आपल्याला हे कळत नाही आणि आपण कुणालाही प्रोत्साहन आणि मदत करून शेवटी पश्चातापाचे धनी होतो. आपण कुणासाठी कितीही करा अपवाद वगळता फार कमी जणांना याची जाणीव असते. आपली फक्त एक चूक होऊद्या आणि बघा मग हीच मंडळी तुम्ही आजवर यांच्यासाठी काय काय केलंय हे विसरून तुमची नुकतीच झालेली चूक कुरवाळीत बसून तुम्हाला दोषी ठरवून मोकळी होतात.
या जगात कुणीच परिपूर्ण नसतं, प्रत्येकात थोडीफार तरी उणीव ही असतेच मात्र जर नातं जपायचं आणि टिकवायचं असेल तर दोघांनीही समंजस असायलाच हवं. फक्त एकाने माफी मागायची चूक असो नसो ती कबूल करायची आणि दुसऱ्याने याची कशी जिरवली, मी माघार घेतली नाही. यालाच माझी गरज आहे या गुर्मीत वावरायचं. अहो चूक असो नसो पण नातं जपण्यासाठी माफी मागणारा खऱ्या अर्थाने शूर असतो.. काही नवख्या लोकांना आपण मुख्यप्रवाहात आणण्यासाठी धडपड करायची आणि हेच लोक नंतर आपल्याला शहाणपणा शिकवितात. फक्त पैसे दिले म्हणजे कुठली गोष्ट घडत नाही. त्यासाठी नियोजन आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून कामं करावी लागतात. आणि प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची ती कामं नेहमी आम्ही करतो. आणि ही आत्मप्रौढी नाही बरे ही वस्तुस्थिती आहे. रोजच्या आयुष्यात अनेक लोक फक्त तोंड ओळखी पुरते येतात आणि जातात. अशा लोकांचा शून्य फायदा असतो. आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय ना माणसं तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.