आकाश होणं तितकसं कठीण नाही हो.. फक्त ते होण्यासाठी स्वतःकडे दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा. आकाशाच्या छत्रछायेखाली आलेल्या पांथस्थाला कवेत घेऊन त्याचे दुःख दूर करण्या एवढे मोठे व्हा.. राग लोभ प्रत्येकालाच असतो हो. पण, या तुमच्या रागाच्या खरजेचा नायटा होऊ देऊ नका.. समोरच्याला सतत दबावात न ठेवता तुम्ही त्याला तुमच्या वाट्याचा आनंद द्यायला शिका. आनंद वाटल्याने वाढतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय.. दराबाहेरील मांडवावर चढलेल्या भोपळ्याच्या वेलीवर आलेला भोपळा तसाच पिकून पुन्हा खाली मातीत पडण्या पेक्षा जर एखाद्या गरजवंताच्या मुखी पडला तर त्या भोपळ्याच्या असण्याचे महत्व असते. आपण एखाद्याला आनंद देऊ शकतो ते आपल्या हाती आहे मग एखाद्या गरजवंताच्या दिशेने निघालेले आपले पाय गोगलगायी सारखे पोटात ओढून घेण्यात काय अर्थ आहे..? आपल्याकडे जर कुणी मदतीसाठी अथवा असीम आनंद मिळविण्यासाठी अपेक्षेने बघतोय तर यात आपण समोरच्याला आनंद देण्यास सक्षम आहोत ही भावना असायला हवी.
आनंदाची अनेक परिमाणं आहेत कुणाला कशात आनंद मिळेल तर कुणाला कशात.. हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. पण तुम्ही आनंद देऊ शकता इतके मोठे अहात हे महत्वाचे.. आजचे आपले आयुष्य फार धकाधकीचे झाले आहे.. कुणाला कुणाची इथे पडलेली नाही.. माणूस माणसाला पारखा होत चालला आहे अशावेळी तुमच्यावरील प्रेमाने, काळजीपोटी, भले रागाने का बोलणारी असूदेत पण जर अशी कुणी व्यक्ती असेल तर तिला तळहातावरच्या फोडा प्रमाणे जपून ठेवा. आम्ही नेहमी बोलत आलेलो आहोत की रोखठोक बोलणारी माणसं मानाने साफ असतात आणि गोड बोलणारी माणसं खूप धूर्त असतात.. अर्थात प्रश्न ज्याचा त्याचा आहे. पण नियती असं कुणालाही कुणाशी उगीचच भेटवत नाही.. काहीतरी पूर्वजन्मीचे लागेबांधे असल्याशिवाय आपण एकमेकांच्या आयुष्यात येतच नाही.. पुन्हा जन्म आहे की नाही हे कुणालाच ठाऊक नाही आणि म्हणूनच या जन्मात दुनियेला न घाबरता जगून घ्या आणि आपल्या माणसांसाठी आकाश व्यापून आकाशापेक्षा मोठे व्हा..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.