पाठीवरचं ओझं उतरवता येतं. पण, मनातलं ओझं उतरवता येणं फार कठीण असतं..

प्रत्येकाच्या मनात, मेंदूत चांगल्या वाईट घडामोडी सतत घडत असतात. आणि मनात रागाची आग, बदल्याची - सुडाची आग, प्रेमातला पराभव, विश्वासघात, संशय, दुस्वास अशा गोष्टींचा वणवा पेटला असेल तर त्या वणव्याची मोठी आग होऊन माणूस आणि नातं भस्म व्हायला वेळ लागत नाही..

पाठीवरचं ओझं जड जरी वाटत असलं तरी आपण थकल्यावर अथवा इच्छित ठिकाणी आपण पोहोचल्यावर ते उतरवता येतं. मनातलं ओझं मात्र आपल्याला आतल्या आत जाळत राहतं. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था होते. भगवान बुद्धाने दुःखाचे मूळ शोधायला सांगितले आहे. आणि मनातलं ओझं उतरवलं तर सगळं शांत होईल असं सांगितलं आहे. पण, ते प्रत्येकालाच जमत नाही. आपण कितीही नाकारलं तरी आपली आवडती आणि नावडती व्यक्ती सतत आपल्या डोक्यात आणि मनात असते. आपण अमुक अमुक माणसाला विसरलो असा आपण मारे बडेजाव मिरवत असलो तरी आपण स्वतःला कधीच फसवू शकत नाही. ती व्यक्ती सतत आपल्या मनात, डोक्यात अगदी चोवीसतास असतेच. आणि अचानक काही कारण नसतांना देखील त्या आपल्या दुश्मन झालेल्या व्यक्तीची अगदी अचानक आपल्याला आठवण येते. 

कधीकधी आपण स्वतःला खूप शहाणे समजू लागतो. मला तो अबोला धरलेला व्यक्ती पुन्हा भेटणार नाही किंवा भेटला तरी मी बोलणार नाही असं आपण बोलतो. पण, तसं होत नाही. इथे एवढं मस्तवाल होऊन आणि अहंकारी होऊन चालत नाही. आणि  आपण देव नाही की आपणच देवाचे लाडके आणि दुसरे दोडके असेही होत नाही. जर देव असेलच ? तर तो जसं तुमचं ऐकतो तसं तो कधीतरी तुमच्या समोरच्याचं सुद्धा ऐकत असेलच ना हो.. कधी कधी या मानवी स्वभावाची खूप गंमत वाटते. मी तेवढाच बरोबर आणि समोरचा चूक.. खरं तर ही विचारसरणीच खूप बालिश आणि मूर्खपणाची आहे. तुम्ही देव नाही हे अगोदर लक्षात घ्या आणि कुणाला घडवण्या बिघडवण्या एवढेही आपण मोठे नाही. जो तो आपल्या मेहनतीने आणि नशिबाने मोठा होतो. मी खूपदा घमेंडखोर लोकांसाठी मुद्दाम चित्या सारखी चार पावलं मागे येतो.. कधीतरी सावज टप्प्यात येतच. ओठात एक आणि पोटात एक असं वागणं खूपदा तुमच्याच अंगाशी येतं आणि संशयी लोकांना समजावीत बसण्यात आपण आपला वेळ वाया घालवायचा नसतो. संशयी लोक हलक्या कानाचे असतात, त्यांना त्यांची कुणी स्तुती केली तर ती खूप आवडते. आणि हे लोक स्वतःच्या सावलीवर देखील विश्वास ठेवत नाहीत. आपल्यासारखी रोखठोक माणसं तोंडावर स्पष्ट बोलून मोकळी होतात. तर मनात रागाचं, संशयाचं, सुडाचं ओझं बाळगणारी माणसं त्यांना मनातलं ओझं खाली उतरवता न आल्याने कायम आतल्या आत जळत राहतात..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

29

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.