मैत्रीतला अबोला नातं उध्वस्त करतो..

आपल्या माणसाचा राग आला तर खुशाल भांडा. आपण ज्याच्यावर आपला हक्क आहे त्याच्याशीच  भांडतो. रस्त्यावरच्या कुणाशीही उठून आपण भांडायला जात नाही. आणि हक्काचे भांडण हे जिवंतपणाचे लक्षण असल्याचं आमचं स्पस्ट मत आहे. राग, लोभ या मानवी प्रवृत्ती आहेत. मात्र, त्याचा अतिरेक होता कामा नये. इथे कुणाच्याच आयुष्याचा कसलाच भरवसा नाही. एखाद्या वेळी डोंगरा आड गेलेला माणूस आपल्याला पुन्हा दिसतो. पण, मातीत गेलेला माणूस पुन्हा कधीच दिसत नाही. म्हणून एकमेकांना समजून घ्यायला हवे. आपण समोरच्याला काय केले आहे याचा विचार करतांना त्याने आपल्यासाठी काहीतरी केले आहे हे आपल्या डोक्यात असल्यावर आपला राग आपोआप निवळतो. आणि असं कुठलं करोडोंच्या प्रॉपर्टीचं भांडण असतं हो आपलं इतकं ताणून धरायला. सगळ्यांशी बोला आणि आनंद घ्या आनंद द्या. संबंध चांगले ठेवायचे असतील तर कधी चार पावलं मागे या आणि कधी चार पावलं पुढे सुद्धा जा. आपल्या जिवलगांशी भांडण झाल्यावर आपले काही समंजस मित्र मैत्रिणी ते मिटविण्याचा प्रयत्न करतात. तर, काही विघ्नसंतोषी मित्र मैत्रिणी आपल्यातल्या भांडणाचा गैरफायदा घेऊन आपलं चांगलं नातं आपल्या जिवलगाला काहीबाही सांगून मोडण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी आपण आपल्या जिवलगावर विश्वासच ठेवत नाही. आपण नव्वद टक्के बरोबर असूही. पण, तो समोरचा निदान दहा टक्के तरी बरोबर असेल ना. मात्र, आपण इतके रागावलेले असतो की आपण समोरच्याचं म्हणणं ऐकूनच घेत नाही. सगळं इथेच ठेवून जायचं आहे हो. फाटक्या तोंडाची माणसं कधीच फसवत नाहीत. तोंडावर बोलतात ते. आणि तुमच्या एवढी तुमची काळजी या रागीट स्वभावाच्या लोकांनाच असते हो. गोड बोलणारी माणसं तुम्हाला दुखवत नाहीत मग तुम्ही चुकीचे का असेनात. कारण या माणसांना तुम्ही खड्ड्यात पडलात तरी अजिबात फरक पडणार नसतो. 

नातं विश्वासावर नाही तर तुम्हाला ते टिकवायचं असेल तर ते टिकतं. आणि आपल्या माणसाच्या चुका मोठ्या मनाने पोटात घेतल्या तर तो माणूस मनातून तुम्हाला नेहमीच धन्यवाद देत असतो. प्रत्येक गोष्ट बोलायला पाहिजे असं नाही हो. काही गोष्टी न बोलताही समजून घ्यायच्या असतात हो. आणि एक गोष्टीचा तुम्ही कधी विचार केलाय का हो. श्रीकृष्ण म्हटलेत की तुमचं पूर्वजन्मीचं काहीतरी नातं असल्याशिवाय तुम्ही या जन्मात भेटत नाही. एक गोष्ट तुम्ही कधी सिरिअसली अभ्यासली आहे का हो. एखाद्या माणसाशी आपले वारंवार खटके उडतात. आपण खूपदा त्याच्याशी बोलत नाही. समोर दिसला तर याचं डोकंच फोडेल असं अनेकदा वाटतं. गेला हा उडत. आता माझा जीव गेला तरी मी याचं तोंड सुद्धा बघणार नाही असं आपण मनाशीच ठरवतो. आणि त्या व्यक्तीशी बोलणं सुद्धा बंद करतो. पण, वारंवार नियती अशी परिस्थिती निर्माण करते की तुम्ही त्याच  माणसा समोर येता. नव्हे नव्हे तुम्हाला यावंच लागतं, मग कारण काही का असेना. हे असं आपल्या आणि आपल्या त्या जिवलगाच्या बाबतीत होतं कारण नियतीनेच तुमची नाळ जोडलेली आहे. आणि नियतीला तुम्हाला या जन्मात या तुमच्या जिवलगापासून अजिबात वेगळं करायचं नसतं. म्हणून जे जे होतंय ते ते होऊ द्या. आणि जे तुमचं आहे ना ते दुनियेत कुठेही गेलं तरी शेवटी तुमच्याकडेच येतं हे कायम लक्षात ठेवा..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

34

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.