ओठात एक आणि पोटात एक.. सतत याच्या त्याच्या दडपणाखाली.. याला काय वाटेल, हिला काय वाटेल.. हा काय बोलेल तो काय बोलेल.. आणि जगण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो 'तेरी भी चूप और मेरी भी चूप'.. असा प्रयत्न.. अरे याला काय अर्थ आहे. आयुष्य एकदाच मिळालंय जगा बिनधास्त आणि ते जगतांना जरा मोकळ्या मनाचे आणि खुल्या दिलाचे रहा. आपल्या माणसाला सांभाळून घ्या, प्रोत्साहन द्या.. आपल्या घासातला घास त्याला भरवा, फक्त आपलंच रडगाणं न रडता त्या आपल्या माणसाच्या आयुष्यात काय संकट आहे, त्याची मानसिक स्थिती काय आहे हे कधीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपणच सतत घेत बसण्या पेक्षा त्या आपल्या माणसाला आपण देण्याची तयारी ठेवा.. आणि मगच तुमची किंमत वाढते हो.. आपल्या माणसांशी कधीच अर्ध सत्य आणि खोटं बोलू नका.. जे काही आहे ते रोखठोक बोला.. आणि जसे बोलाल तसे वागा देखील.. नाहीतर जा आपल्या जिवलगांना मधेच सोडून पळून.. होय पण हे जगतांना अगदी कंबरेचं सोडून डोक्याला मात्र गुंडाळू नका.. सर्वसामान्यांच्या आयुष्यात रोज खूप कटकटी असतात.. बिनधास्त जगण्याने चिंता दूर होतात.. तसं पाहिल्यास चिंता चितेवर गेल्याशिवाय संपत आणि सुटत नाहीत हो. पण, मग म्हणून तेच तेच टेन्शन घेण्यात काय अर्थ आहे. कधी जन्म होतो आणि कधी म्हातारपण येतं आणि कधी एकेदिवशी मरून जावं लागतं हे कुणालाच कळत नाही आणि चुकलेलं सुद्धा नाही. हे असंच आहे आणि असंच राहणार आहे.. आणि म्हणूनच बिनधास्त रहा.. आर या पार.. जे होईल ते पाहू इतके बिनधास्त..
दुनियेला घाबरून काही करू नका तर दुनियेच्या छातीवर पाय रोवून जे करायचे ते करा. दोस्ती आणि प्रेम न लाजता करा.. दुश्मनी करून, एखाद्याशी अबोला धरून, टोमणे मारून, एखाद्याला शिव्या शाप देऊन, संशय घेऊन, एखाद्यावर जळून, याची त्याची स्वतःशी तुलना करून, असूया धरून काही साध्य होत नाही.. याच्या त्याच्यावर जळत बसण्या पेक्षा तुमच्या हक्काच्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या हाताने घट्ट पकडून का ठेवत नाही.. मग ते नातं कुठलं ही असो.. जगणं ही कला आहे. ती कला प्रत्येकालाच जमते असे नाही. मनात संशयाचे ढग दाटून आलेले असतील तर विश्वासाचा पाऊस कधीच पडत नाही. आनंद घेणारा पाच रुपयाचे चणे शेंगदाणे खाऊन सुद्धा आनंदी होतो आणि सतत संशयाने पछाडलेला पंचतारांकित हॉटेलात जेवला तरी आनंद घेऊ शकत नाही. आनंदाची देवाण घेवाण तुम्ही तरुण की म्हातारे या तुमच्या वयावर अवलंबून नसते.. हिंमत हारून डरपोका सारखं पळून जाण्या पेक्षा हिमतीने आपल्या माणसांना धरून ठेवा आणि मग बघा जगणं किती सुंदर आहे ते.....
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.