वृद्धाश्रम वाढू लागलीत कारण काय..??

परिस्थितीने गरीब शेतकरी अथवा गरीब घरातील मुलं आपल्या आई - वडिलांना कधीच वृद्धाश्रमात ठेवत नाहीत. पोटात नऊ महिने जड झाला नाही तर ताटात जड होईल का.. असं अभिमानाने म्हणणाऱ्या कितीतरी माता आज मी जेव्हा वृद्धाश्रमात वर आडाकडे डोळे लावून बसलेल्या अथवा झोपलेल्या पाहतो तेव्हा खरंच असं वाटतं की या बाईने या नालायक पोराला पोटात असतांनाच मारून का टाकलं नाही.. पण, असं होत नाही आणि सहसा होणार ही नाही. पुत्र जरी कुपुत्र झाला तरी माता कधीच कुमाता  होत नाही. वृद्धाश्रमात जायला हल्ली मला भीतीच वाटते. कारण वृद्ध मंडळींचे कुणाची तरी म्हणजे त्यांच्या मुलांची वाट पाहणारे विझत चाललेले भावुक डोळे आणि थरथरतं शरीर बघण्याचं माझ्यात धाडस नाही. गावाकडे म्हातारी म्हातारा कितीही त्रास देत असेल, आजारी असेल तरी म्हातारपण हे दुसरं बालपण आहे असं समजून लोक आई वडलांना शेवट पर्यंत सांभाळतात. सांभाळतात म्हणजे उपकार करीत नाहीत.. ज्यांनी जन्म दिला खाऊ पिऊ घातलं आणि शिकवून कामविण्या इतकं मोठं केलं. खरं तर त्यांचेच आपल्यावर उपकार आहेत. खूपच खूपच बिकट परिस्थिती असेल म्हणजे नोकरी धंद्यानिमित्त परदेशी असणे, घरात इतर कुणीच नाही अथवा अगदी एखादं दुर्मिळ कारण असेल तर आपण वृद्धाश्रम समजू शकतो. पण, सगळं आलबेल असूनही केवळ म्हाताऱ्या मंडळींना डस्टबिन समजून घराबाहेर काढणाऱ्या मुलांचा आणि सुनांचा मी निषेध करतो..

इथे मला एक मुद्दा मांडायचा आहे, सर्वच सुना वाईट नसतात. पण, आज रोजी पंच्याण्णव टक्के सुना या सासू सासरे, दीर, जावा, नणंदा यांची आपल्या संसारात अडचण नको या मनोवृत्तीच्या असतात. स्त्री चांगली असेल तर घराचं नंदनवन होतं आणि स्त्री कजाग, माणूसघाणी असेल तर घराचे बारा वाजतात. मुळात आज खूपशा आई लोकांचा मुलीच्या संसारात हस्तक्षेप वाढल्याने संसार धडाधड मोडत आहेत. मुली पेक्षा आईच्याच अपेक्षा जास्त असतात. मुश्किलीने वडापाव खाणारी मुलगी नवऱ्याकडून बर्गर आणि इतर महागड्या गोष्टींची अपेक्षा करते. स्वतःच्या बापाने रिटायर्ड  झाल्या नंतर घर घेतलेले असते. पण, पंचविशी तिशीतल्या नवऱ्या मुलाचं स्वतःचं घर आहे का, अशी अपेक्षा करायची. मुळात काही अपवाद वगळता पुरुष बायकांच्या ताटाखालचं मांजर झालेले असल्याने बायका डोक्यावर बसतात. मुळात मुलीला तिच्या माहेरीच चांगले एकत्र कुटुंबाचे संस्कार लावणे आज पुन्हा एकदा काळाची गरज झालेले आहे. घर छोटे असेल कदाचित पण मन मोठे असावे लागते हो. मन मोठे असेल तर छोट्या घरातही सगळे गुण्यागोविंदाने नांदू शकतात. पण आज आपण आपल्या गरजा वाढविल्या आहेत.. गरज वाढविणे राहणीमान सुधारणे वाईट नाहीच मुळी.. पण, या काही अनावश्यक वाढविलेल्या गरजाच नात्यांचा मुडदा पाडीत आहेत याचा आपण विचार करायलाच हवा.

नातवंडांपासून आजोबाला तोडणं, मुला पासून बापाला तोडणं.. कुठे फेडाल हे पाप. उद्या तुमची मुलं तुम्हाला वृद्धाश्रमात धाडतील तेव्हा तुम्हाला कळेल. मी अनेक वृद्धाश्रमांत नेहमीच जात असतो पण इथे कुणीच मनातून आनंदी आहे असे मला कधीच जाणवले नाही. पर्यायच नाही आणि मरण येत नाही म्हणून कसं तरी मरे पर्यंत जगायचं अशी इथल्या वृद्धांची मनस्थिती झालेली आहे. भले काही वृद्धाश्रम खुप चांगली आहेत तरी हा सोन्याचा पिंजरा आहे. स्वतःच्या मुलाबाळांना सोडून परक्या ठिकाणी कुणी आनंदी राहील काय हो.. कठीण आहे हे सर्व आणि भाव भावना असलेल्या आपल्यासारख्या लोकांना तर हे पचविणे शक्यच नाही. शेवटी ज्याचं त्यालाच कळायला हवं.. मात्र, वृद्धाश्रम जेव्हा खऱ्या अर्थाने संपूर्णपणे बंद होतील तेव्हाच माणुसकी आणि संस्कार जिकंले असे वाटेल..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

25

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.