मनातलं पान : आतले.. बाहेरचे आणि मनातलं मनात दाबून ठेवणारे..

माणसाच्या स्वभावाबद्दल आजवर अनेकदा बोललं गेलंय लिहीलं गेलंय.. आजवर अनेक शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी  मनाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अद्याप मन नक्की काय आहे हे कुणालाच पूर्णपणे कळलेले नाही. मन हा शरीराचा एखादा अवयव नाही. पण तरी सुद्धा मनाचे अधिराज्य व्यक्तीच्या संपूर्ण स्वभावात झिरपलेले असते. मनाचा संबंध मेंदू आणि भावनेशी जोडला जातो. एखाद्याच्या स्वभावाचा फक्त आपण अंदाज लावू शकतो मात्र ती समोरची व्यक्ती कुठल्या वेळी कशी वागेल, बोलेल हे कुणीही सांगू शकत नाही कारण त्या वेळी जी जी परिस्थिती असते त्यावर हे सर्व अवलंबून असू शकते. मात्र तरी सुद्धा मनोविकारतज्ज्ञ आणि काही डॉक्टर मनाबद्दल बोलतात. त्याच्या मते व्यक्तीचे तीन स्वभाव असतात. आपल्या सारख्या सर्वसामान्यांना एकतर व्यक्ती रोखठोक असते नाहीतर कमालीची आतल्यागाठींची असते एवढेच ठाऊक असते. म्हणजे एखाद्याचा स्वभाव आतला असतो तर एखाद्याचा बाहेरचा.. बाहेरच्या स्वभावाची माणसे खूप बिनधास्त असतात. ती रोखठोक असल्याने जे वाटेल ते बोलून  मोकळी होतात. त्यांची काही चूक झाली तर तीही बिनधास्त सांगून टाकतात व माफी मागतात. मैत्रीला ही माणसे खूप छान असतात. जीवाला जीव देतात.. त्यांची चूक असो अथवा नसो मात्र नातेसंबंध टिकण्यासाठी ही माणसे तुम्हाला हजारदा सॉरी बोलू शकतात. पण जर तरीही तुम्ही डोक्यात गेलात तर मात्र ही माणसं शांतपणे तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून अगदी कायमचं हद्दपार करतात.. आतल्या स्वभावाची माणसं कधीच पूर्णसत्य बोलत नाहीत ती त्यांना जेवढं त्यांच्या फायद्याचं ठरणार असेल तेवढंच तुमच्याशी बोलतात. म्हणजे त्यांच्या गरजेपुरतं अर्धसत्य बोलतात.. ही माणसं तुमच्याशी डायरेक्ट पंगा सुद्धा घेत नाहीत. पण, तुम्हाला पूर्ण जवळ सुद्धा घेत नाहीत. यांचा व्यवहार तोलून मापून असतो. या माणसांना स्तुती फार आवडते. यांच्या जरा जरी मनाविरुद्ध आपण वागलो बोललो  तरी यांच्यावर आभाळ कोसळतं. ही माणसं सत्य ऐकू शकत नाहीत. स्वतःच्याच मोठेपणात धन्यता मानतात..

आता तिसऱ्या प्रकारची माणसं.. जी मनातलं मनातच ठेवतात. मात्र, तुमच्याशी बोलतांना असे काही बोलतात की ही व्यक्ती आपलीच आहे असे आपल्याला वाटल्याशिवाय आपण राहू शकत नाही. मात्र, यांचे हे बोलणे वरवरचे असते.. मनाच्या वरून ही माणसं आपल्याशी बोलतात. यांच्या मनात आपल्या बद्दल खूप राग असतो. पण हे लोक तो राग मुळीच दाखवीत नाहीत. देखल्या देवा दंडवत म्हणतात अशा प्रकारचं यांचं वागणं बोलणं असतं. कमालीची संशयी असतात ही माणसं. पण, यांच्या हे लक्षातच येत नाही की समोरचा कालच जन्माला आलेला नाही. एक दोन संभाषणांतच समोरच्याला यांच्या अंतरात काय दडलंय ते कळतं आणि मग तो समोरचाही यांच्याशी हे बोलतात तसंच बोलत राहतो मनाच्या वरून.. पण ही तोंडावर गोड बोलणारी माणसं जास्त घातक असतात. ही माणसं कधीही त्यांचे शब्द फिरवू शकतात आणि तुम्हाला एकटं पाडू शकतात. हे लोक स्वतःपेक्षा आपल्याला दुनिया काय बोलेल याचाच जास्त विचार करतात.. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि मनोवृत्ती म्हणतात ते काही खोटे नाही. आणि म्हणूनच जे काही आहे ते माणसाने रोखठोकच बोलावे. समोरचा आपला असेल तर तो काहीही झालं तरी आपलाच राहतो आणि नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचं काळीज कापून दिलं तरी त्याला त्याची कदर नसते..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

68

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.