चिंता आणि चिता या गोष्टी तसे पाहिल्यास फारच जवळच्या आहेत. माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीला मात्र हे मान्य नाही. ती आनंदी असल्याने आणि तिच्या आनंदात माझ्यासारखा बहुआयामी व्यक्ती आनंद मानून तिला सतत प्रोत्साहन देत असल्याने तिला इतके वर्ष सोबत राहून सुद्धा माणसं अजिबात कळत नाहीत हा निष्कर्ष मी काढला आहे. खूप प्रॉब्लेम असतील आणि ते सोडविण्याचा आपण हार न मानता कसोशीने जरी प्रयत्न करीत असलो तरी आणि तुम्हाला कितीही खायला प्यायला असलं तरी चिंता असल्याने माणूस आतून पोखरला जातो. आणि त्याचा चेहरा कितीही मेकअप केला तरी निस्तेजच वाटतो. कारण मेंदूत, हृदयात आणि मनात सतत वादळ घोंघावत असतं. पण या गोष्टींची कधीच झळ न बसलेली माझी मैत्रीण दिलखुलासपणे चिंताग्रस्तांची खिल्ली उडविते. देव न करो तिच्यावर कुठलं संकट येवो. पण म्हणतात ना ज्यांना अगदी लहानपणापासून प्रॉब्लेम फेस करण्याची नियतीने सवय लावलेली असते ते शेवट पर्यंत लढत राहतात आणि त्यांचा अनुभव म्हणूनच दांडगा होतो. आता माझ्या या मैत्रिणीने कधी असं टेन्शनच न पाहिल्याने तिला इतरांच्या व्यथा टाईमपास वाटतात. एक मात्र अगदी सगळ्यांनीच शिकायला हवं की, आपल्या चिंता, व्यथा आणि समस्या सगळ्यांनाच सांगत सुटायचं नाही. पण, तरीही आपलं समजून आपण काही जणांना चुकून बोललो तर ती व्यक्ती तुम्हाला समजून घेण्या एवढी समजूतदार हवी. ती व्यक्ती जर फक्त स्वतः पुरतीच जगणारी आणि मौज मजा करणारी असेल तर मात्र ती व्यक्ती निश्चितच तुमच्या चिंतेची आणि तुमची खिल्ली उडवेल.
म्हणून आपले प्रॉब्लेम कुणालाही सांगत बसू नका. रोजच्या जगण्यात आपल्या बरोबर वावरणारी व्यक्ती खूप चिंतेत असू शकते. अशा व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम असू शकतात. पण, तरी ही व्यक्ती समाजात वावरतांना खूप आनंदी असल्याचे भासवून जगत असते. सर्वात ज्यास्त हसणाऱ्या व्यक्तीला सर्वात ज्यास्त वेदना असतात. अर्थात हे कळायला समोरचा तेवढा बुद्धिमान आणि विशाल हृदयाचा असायला हवा. आणि तुम्ही आनंदी अहात म्हणून समोरचा ही तसाच असेल हे समजणे फार बालबुद्धीचे आहे. अर्थात प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असू शकतात. काही मंडळी पाषाण हृदयाची असतात त्याला कोण काय करणार. जर देव असेलच तर तोही जो प्रॉब्लेम फेस करू शकतो त्यालाच प्रॉब्लेम देतो म्हणतात. देवालाही कदाचित माहित असतं की पळपुटे कधीच प्रॉब्लेम सोडवू शकत नाहीत.. अंधारा नंतर सूर्य उगवतोच हा सृष्टीचा नियम आहे.. चिंता, समस्या, वेदना, दुःख या गोष्टी कधीच कायम सोबत राहत नाहीत. आज ना उद्या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद येतोच. पण, त्या वेळी आपल्या वेदनेवर हसणारी माणसं आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्यांना कधीच विसरूही नये..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.