हल्ली माणसा माणसांतला दुरावा वाढत चालला आहे..

आपण एकमेकांना गृहीत धरू लागलो आहे. गुड मॉर्निंग केलं की संपलं आपलं काम ही मनोवृत्ती आपल्यात वाढू लागल्याने कुठेतरी जिव्हाळा कमी होत चालला आहे का हा संशोधनाचा विषय होऊ शकतो..? माणूस माणसांच्या गर्दीत हरवला आहे. आजूबाजूला खूप माणसं आहेत. पण, त्यातील आपली माणसं कोणती हे ओळखणे आपण विसरत चाललो आहे. रोज गर्दीचा महापूर, रोजच्या गरजा आणि अपेक्षांचा महापूर, आनंद, चिंता, हेवेदावे, टेन्शन आणि जसं आणि जोपर्यंत चाललंय ना तोपर्यंत चालू दे ही मानसिकता आता बदलण्याची गरज आहे. खूपदा पैसे नाही तर तुमचं प्रत्यक्ष सोबत असणं, एकमेकांशी संवाद साधनं गरजेचं असतं. पण, दुर्दैवाने आज एकमेकांशी संवाद साधायला आपल्याकडे वेळच नसतो असं आपण अगदी सहज बोलून जातो. एक फोन केल्याने आपला असा कितीसा वेळ वाया जाणार आहे हो.. पण, आज समोरच्याला फोन करायला सुद्धा आपल्याला कंटाळा येतो. तत्त्ववेत्ते ओशो म्हटले आहेत की, उद्या भेटायचं तर आजच भेट, मेल्यानंतर मदत करण्या पेक्षा जिवंतपणीच मदत कर आणि एकमेकांशी बोलत राहा. ते म्हणतात की, आपल्याशी बोलू न शकण्या इतकं बिझी कधीच आणि कुणीच या जगात नाही. आवड असली आणि प्रेम, जिव्हाळा असला की माणूस बरोबर वेळ काढतो.

याच विषयावर एका विद्वानाचे भाषण ऐकण्यात आले. ते म्हणतात की तुम्ही आठ तास झोपता असं आपण समजू, आठ तास काम करता, चार तास तुमच्या वैयक्तिक रोजच्या कामासाठी काढता, आणि समजा दोन तीन तास तुमच्या मनोरंजनासाठी काढता  तरी तुमच्या हातात एक तास उरतो.. आणि त्या एका तासातली पाच दहा मिनिटं सुद्धा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीची विचारपूस करण्यासाठी काढली नाहीत तर तुम्ही बिझी आहेत हे खोटं बोलत आहेत. त्यांच्याच मतानुसार या जगात चोवीस तास कधीच आणि कुणीच बिझी नसतं. मला काय बोलायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. आपल्याशी बोला अशी आपण कुणावर बळजबरी करू शकत नाही आणि करूही नये. पण, बोण्यासाठी आसुसलेली ज्येष्ठ मंडळी बघितल्यावर खाण्या पिण्या एवढेच जगण्यासाठी आपल्या माणसांशी बोलणे हे सुद्धा औषध आहे हे लक्षात येते. आणि हा अबोला हळू हळू पहले आप पहले आप.. या नियमानुसार तुमच्या नात्याला वाळवी लावतो आणि मग एक चांगल्या नात्याचा शेवट झाल्यावर तुम्ही काय गमावले आहे याची तुम्हाला जाणीव होते..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

24

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.