जसजसा रात्रीचा अंधार अंगावर स्वार होतो तसतशी रेल्वे फलाटावरील आणि जिन्यावरील गर्दी स्वतःचा चेहरा हरवलेली दिसते. धकाधकीचे आयुष्य जणू घड्याळ आणि रेल्वे रुळांशी बांधले गेले आहे याचे प्रत्यंतर पोटात सुख दुःख घेऊन वावरणारी आणि चेहरा असूनही नसलेली गर्दी पाहून आपल्याला अनुभवास येते. मला आमच्या शहरातील लोकांचे नेहमीच खूप कौतुक वाटते. जगण्याच्या समस्या रोजच समोर येत असतांनाही हे लोक दुःखाला रोज फसवतात. रेल्वेचे जिने चढता उतरतांना प्रत्येकाच्या मनात व्यक्तीपरत्वे वेगवेगळे भाव असतात. पण, उद्या, पुन्हा सकाळी उठायचं आहे आणि काहीही झालं तरी जगण्याच्या छातीवर पाय देऊन जगण्याला जगून दाखवायचं आहे ही प्रेरणा घेऊन इथले लोक लहान मुलांसारखे बंद मुठीत आणि उघडझाप होणाऱ्या पापण्यांमध्ये स्वप्न फुलवीत राहतात. मला हे खूप भावतं आणि चावतं सुद्धा आणि मग अचानक माझा हात हे क्षण टिपण्यासाठी मोबाईल बाहेर काढतात..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.