मॉल मध्ये महागडी वस्तू घेतांना किंमत कमी करा म्हणून अजिबात घासाघीस न करणारे ९९ टक्के लोक बाहेर टोपली घेऊन बसलेल्या गरीब भाजीवालीशी दोन पाच रुपये कमी कर म्हणून वादावादी करतात. खरं तर उन्हातान्हात बसलेल्या त्या बाईला दोन रुपये जास्त गेल्याने मॉल मध्ये खरेदी करायला गेलेल्या बहुतांशी सुखवस्तू असलेल्या माणसांना विशेष फरक पडणार नसतो. पण, तरी खूपदा घासाघीस केली जातेच. स्वतः जवळ खूप पैसे असून मुळीच चालत नाही तर ते देण्याची खर्च करण्याची दानत सुद्धा लागते. हल्ली काही अपवाद वगळता खूपसे लोक सगळं फुकटातच बघतात. समोरच्याला पोट आहे याचा ते विचारच करीत नाहीत. आणि याचा वारंवार मला फटका बसत आहे. सर ती आमची अमुक बातमी छापा, सर आमचं आर्टिकल छापा ना तुमच्या वृत्तपत्रात, सर आम्हाला प्रसिद्ध करा ना तुमच्या माध्यमातून.. अरे हो हो.. काही तर अर्धा कप कटिंग चहा बळेबळे प्यायला लावून दोन हजाराची बातमी छापा अशी गळ घालतात. आज पर्यंत सगळ्या सामाजिक आणि लोकोपयोगी आरोग्यविषयी बातम्या मी नेहमीच फुकटात लावत आलेलो आहे. गोरगरिबांच्या बातम्यासुद्धा फुकटात लावल्या आहेत आणि कायम लावील. पण वृत्तपत्र चालवणं सोपं नाही खूप खर्चिक आहे आणि मलाही गुगल आणि इतरांना पैसे द्यावे लागतात याचा जवळपास कुणीच विचार करीत नाही. माझा स्वभाव दिलदार आणि मदत करणारा आहे..
एकदा आपलं म्हटलं की मग ती व्यक्ती आपलीच अशी माझी विचारधारा आहे. पण मी आपली समजणारी व्यक्तीच माझा जास्त गैरफायदा घेते आणि स्वतःची फुकटात प्रसिद्धी करून घेते. मला हे कळत नाही असं मुळीच नाही. पण, मैत्री शक्यतो मी सहजासहजी तोडत नाही. काही मंडळी बातमी लावा पैसे देतो सर म्हणतात, काही जाहिराती लावून घेतात आणि स्वतःला माझ्या माध्यमातून गाजवून घेतात. पण, स्वतःहून कधीच पैसे देत नाहीत. आणि कधीकाळी आपण त्यांना त्या पैशाची आठवण करून दिली तर आपल्याशी बोलणं बंद करतात. इतर ठिकाणी हे लोक पैसे देऊन गाजतात आणि मला मात्र फुकटात वापरून घ्यायला बघतात. अहो दहा वीस हजार रूपये पगार असलेल्यांचं तर सोडाच हो इथे तर लाखाच्या पुढे पगार असलेलेही एका बातमीचे हजार पाचशे रुपये द्यायला हजार कारणं सांगतात. आणि इतरत्र मात्र याच कामाचे पैसे देतात. म्हणून आता कुणाला फुकटात गाजवायचं नाही आणि मग तो कुणीही असो माझा जवळचा दूरचा त्याने माझ्या कामाचा कमी जास्त का होईना पण मोबदला दिल्याशिवाय बातमी लावायचीच नाही हे मी ठरवून टाकले आहे. या लोकांनी माझ्या चांगल्या स्वभावाला आणि मला गृहीत धरल्याचे जास्त दुःख आहे. यांना कळतं सगळं मात्र वळत काहीच नाही. काही जण आपल्या वृत्तपत्रात बातम्या लावून परस्पर पैसे घेतात हे सुद्धा कळले आहे. तर काही जणांना गरज लागल्यावर माझी आणि आपल्या पेपरची आठवण येते. म्हणूनच म्हणावेसे वाटते की ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नका माती तोंडात येते..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.