खूपदा आपल्या दरवाजावर संधी नॉक करून जाते. पण, आपण पळत्याच्या पाठी लागलो असल्याने आपल्याला त्या संधीची जाणीव होत नाही. आणि मग नंतर कधीतरी वेळ निघून गेल्यावर आपण काय गमावले आहे याची आपल्याला जाणीव होते..
हल्लीच्या स्वार्थी जमान्यात माझं ही माझं आणि तुझं ही माझं अशी प्रवृत्ती फोफावत आहे. खूपशी मंडळी फक्त स्वतःच्याच पोळीवर तूप ओढीत आहेत. गरजेपुरता तुमचा वापर करू तुम्हाला नंतर अडगळीत फेकून दिले जात आहे. एक साधीशी गोष्ट अशी की नव्वद टक्के मंडळी लोकांमध्ये आणि खाजगीत तुमचे गुणगान करतांना दिसतात. पण, प्रत्यक्षात तुम्ही त्यांना राब राब राबणारे ओझ्याचे गाढव म्हणून भेटलेले असता आणि फुकट राबणाऱ्याला कोण कशाला सोडेल हो.. खोटी स्तुती करायला काय पैसे थोडे खर्च होतात. मी स्वतः असा खूप ठिकाणी राब राब राबलो आहे आणि अशा कितीतरी संधी सोडल्या असल्याने मला संधी सोडल्यानंतर किती स्ट्रगल करावे लागले याची जाणीव आहे. काही मंडळींना खूप साऱ्या गोष्टी फुकट साकारण्याची संधी मिळते. अरे हे करा रे.. अरे ते करा रे.. हे तुमच्या फायद्याचे आहे असे आपण समोरच्याला पोटतिडकीने सांगत असतो. पण, दुर्दैवाने अशी व्यक्ती मृगजळाच्या पाठी धावत असल्याने त्याला आपले म्हणणे पटत नाही. मला स्वतःला आजवर कुणीच पुढे येण्यासाठी अथवा माझे छंद आवडी निवडी जोपासण्यासाठी मदत केलेली नाही. जे जे भेटले ते पाय खेचणारेच भेटले. आणि म्हणून मी माझ्या संपर्कातील अनेकांना माझ्यापरीने संधी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आलेलो आहे.
काही लोक मला गांभीर्याने घेतात तर काही डोळ्यावर इतरांच्या मोठेपणाची झापड चढवलेले गृहीत धरतात. नुकसान माझे नाहीच कारण मला माहित आहे की स्वतःला पैसेवाली आणि मोठी समजणारी खूपशी मंडळी फक्त गोड बोलून तुमचा वापर करून घेतात. तुम्ही त्यांच्या मनासारखं वागणं सोडा आणि मग बघा हे लोक तुम्हाला किंमत देतात का ते.. नाही देणार अजिबात नाही देणार.. एक साधीशी गोष्ट आहे मित्रांनो जर कुणी आपल्याला प्रामाणिक आणि निस्वार्थीपणे मान देत असेल तर तो मान घ्यायला आपल्याला यायला हवं.. या मतलबी दुनियेत तुमची हौस आणि तुमच्या भल्याचा विचार करून तुमची काळजी घेणारी माणसं दुर्मिळ आहेत. आणि चकाकणाऱ्या खोट्या गोष्टींना भुलून जर तुम्ही अशा माणसांना अव्हेरत असाल तर आयुष्यात तुम्ही कधीच यशस्वी होणार नाहीत. आयुष्य हा सापशिडीचा खेळ आहे हो.. बेगडी खोट्याच्या पाठी लागून तुम्ही नव्यान्नव पर्यंत पोहचू शकता पण तिथून पुन्हा खाली मातीत येऊन शून्य होता. म्हणूनच म्हटले आहे ना देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.. आता जर तुमची झोळीच दुबळी असेल तर त्याला कोण काय करणार हो..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.