हल्ली एकत्र कुटुंब पद्धती झपाट्याने मोडकळीस येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याला करणे काही का असेनात. पण, काही अपवाद वगळता आज खूपशा लोकांना आणि विशेषतः तरुणींना आपल्या नवऱ्या सोबत आपण एकटेच रहावे. सोबत सासू सासरे नसावेत, नणंद, दीर अगदी कुणीही नसावे असे वाटते. याला कारणीभूत या तरुणींच्या माहेरचं म्हणजेच आईचं चुकीचं मार्गदर्शन आणि दिलं गेलेलं टॉनिक असल्याचा आम्ही थेट आरोप करीत आहोत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असतांना सुख दुःख आणि कुठलीही समस्या चुटकीसरशी सोडवली जात होती. पण, आज विभक्त कुटुंब पद्धतीने माणसातील माणूस तर सोडाच पण रक्ताची नाती सुद्धा परकी वाटू लागली आहेत. आईला मुलाकडून पैसे मागायला अवघडल्यासारखं वाटत आहे. खूपशा ठिकाणी जागेचा प्रश्न, परगावी नोकरीचा प्रश्न आणि वैयक्तिक प्रश्न असल्याने एकत्र राहणे शक्य नसते. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी एकत्र राहायला अजिबात हरकत नाही. आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीचे कट्टर पुरस्कर्ते आहोत. एकत्र कुटुंबात कुणी आर्थिकदृष्ट्या कमजोर असला तरी त्याला सांभाळून घेतले जाते हा मोठा फायदा होतो. इथे प्रत्येकजण आपले योगदान देत असतो आणि एकमेकांत खूप प्रेम असते.
आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाचा इतिहास..
१९९३ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ठराव - ए/आरईएस/४७/२३७ मध्ये जाहीर केले की, दरवर्षी १५ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जावा. हा दिवस कुटुंबांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता वाढविण्यात मदत करतो. सामाजिक आणि आर्थिक प्रक्रियेचा जगभरातील कुटुंबांवर कसा परिणाम होऊ शकतो याबाबत मदत करतो. हरवत चाललेली रक्ताची नाती एकत्र राहिल्याने बहरतात म्हणून एकत्र कुटुंब पद्धती या गोष्टीचा आपण आदर राखायलाच हवा..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.