सध्या उल्हासनगर वाहतूक विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या सुखदेव पाटील यांना त्यांच्या एकूणच समाजकार्य आणि कोविड काळात त्यांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे..
धुळे जिल्यातील काळखेडे गावचे सुपुत्र सुखदेव पाटील १/८/१९९२ रोजी महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले आणि आपल्या अंगची चिकाटी, प्रामाणिक मेहनत, अभ्यासू वृत्ती, धाडस आणि समाजातील अगदी शेवटच्या थरापर्यंत पोहचून काम करण्याची हातोटी यामुळे संपूर्ण पोलीस खात्यात सुपरिचित झाले. जवळपास ३४ वर्षे पोलीस सेवेत कार्य करतांना पाटील साहेबांनी ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त योगदान दिले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. क्राईम ब्रांच, खंडणी विरोधी पथक, वाहतूक विभाग अशा जवळपास सर्व विभागांत गुन्हे उकल करण्यांत त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. मूळचा सामाजिक पिंड असल्याने पाटील साहेब अगदी पहिल्यापासूनच समाजसेवेत हिरीरीने भाग घेत आहेत. त्यांची समाजसेवा लक्षात घेता त्यांना भीमरत्न पुरस्काराने त्याच बरोबर कोरोना काळात त्यांनी जे अभूतपूर्व काम केलेले आहे ते पाहून राज्यपाल कोविड योद्धा हा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. सोशल मीडियावर पाटील साहेबांचे समाजकार्य आणि एकूणच पोलीस कारकिर्दीची माहिती वाचायला, पाहायला मिळते. गुन्हे विश्वातील सुरेश मंचेकर, छोटा राजन, अरुण गवळी, अश्विन नाईक, गुरु साटम ते थेट दाऊद गँगच्या अनेक गुन्हेगारांचे त्यांनी कंबरडे मोडले आहे.
सध्या ते उल्हासनगर वाहतूक विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. वाहतूक विभागात सुद्धा त्यांनी त्यांच्या नावाचा दरारा निर्माण केला आहे. पार्किंग., मॉडिफाय सायलेन्सर आणि एकूणच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर, रिक्षांवर आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर ते कडक कारवाई करतात. वाहतुकीचे नियम पादचारी आणि वाहनचालकांनी पाळायलाच हवेत असे ते सतत सांगत असतात व या संदर्भात स्टेट मार्गदर्शन करीत असतात. ३४ वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक चांगले वाईट अनुभव घेतले व त्यातून ते परिपक्व होत गेले असे त्यांनी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राशी बोलतांना सांगितले. खाकी वर्दीतला गुन्हेगारांचा कर्दनकाळ तर सर्वसामान्यांसाठी हळव्या मनाचा माणूस अशी सुखदेव पाटील साहेबांची इमेज आहे. येत्या ३१ मे २०२५ रोजी पाटील साहेब सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, अंगी समाजसेवा असल्याने सामाजिक विधायक कामांत मी सतत कार्यरत राहील असे त्यांनी बोलून दाखविले. समाजसेवेत आणि कोविड काळात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे पाटील साहेबांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. संपूर्ण पंचक्रोशी, साहेबांचा धुळे जिल्हा, महाराष्ट्र पोलीस विभाग आणि वरिष्ठ अधिकारी, सहकारी तथा डोंबिवलीच्या महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुरेश बोरसे सर आणि शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव यांनी सुखदेव पाटील साहेबांचे अभिनंदन केले आहे तथा त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यास आभाळभर हार्दिक शुभेछया दिल्या आहेत..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.