शब्द खड्गचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा हरहुन्नरी गायक, कवी-लेखक, समाजसेवक आणि सुप्रसिद्ध व्याख्याते हरपले..
मनामध्ये अनेक वादळं आणि वेदना घेऊन त्याचा अजिबात बाऊ न करता हरफन मौला आयुष्य जगणारे तितकेच हळव्या मनाचे कवी, लेखक, गायक आणि समाजसेवक, सुप्रसिद्ध व्याख्याते त्याचबरोबर कॉलेजात इंग्रजी विषय शिकविणारे प्राचार्य डॉ. अरुण अहिरराव यांचे काल बुधवार दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सर मुळीच आजारी वगैरे नव्हते. सर अंबरनाथ येथे राहत होते. एका कामासाठी ते डोंबिवलीतील त्यांच्या एका हितचिंतकांच्या घरी बसले असतांना त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि तिथेच हृदयविकाराचा झटका आला. सरांना अगोदर एका खाजगी रुग्णालयात नेले तिथे केस क्रिटिकल आहे असे सांगितले मग त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. तिथे ते मृत झालेले असल्याचे डॉक्टरांनी निदान केले.
प्रा. डॉ. अरुण अहिरराव सरांच्या व्यक्तिमत्वाचा धावता आढावा..
एसएनडीटी महिला महाविद्यालयातून जेमतेम अडीच तीन वर्षांपूर्वी रिटायर्ड झालेले अहिरराव सर म्हणजे धगधगता अंगार. अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व, अहिराणी, इंग्रजी आणि हिंदी, मराठी भाषेत सरांनी विपुल लेखन केलं आहे. अहिराणी, हिंदी, मराठी भाषेत सरांनी अनेक गाणी गायली आहेत. पहाडी आणि अत्यंत गोड आवाजाची सरांना जन्मजात देणगी लाभली होती. अत्यंत हुशार व्यक्तिमत्व तथा रोखठोक स्वभाव. मात्र, या रोखठोक स्वभावाने सरांचे अनेकांशी खटके सुद्धा उडायचे. पण, सर कधीच या गोष्टींना घाबरले नाहीत. सर आंबेडकरी चळवळीत सुद्धा स्वतःला झोकून काम करायचे. आजतागायत सरांनी अनेक विद्यार्थ्यांना फक्त मार्गदर्शनच केले नाही तर रोजीरोटी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. शब्द खड्ग आणि सरांचे अतूट नाते होते. शब्द खड्गने आयोजित केलेल्या कितीतरी कार्यक्रमांचे सर अध्यक्ष होते आणि गायनाच्या स्पर्धेचे परीक्षक सुद्धा होते. नेहमी मला न चुकता गुड मॉर्निंग करणारे सर आणि आता पुन्हा त्यांचा आवाज फोनवर दिपक सर काय चाललंय असा कधीच कानी पडणार नाही ही खंत कायम मनात राहील. मी जेव्हा जेव्हा सरांना बोलवायचो तेव्हा तेव्हा सर कुठेही असोत ते माझ्याकडे यायचेच. अहिरराव सर, मी आणि नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका सौ. रेखा निकुंभ असे आम्ही तिघे मिळून अनेक गाण्यांचे कायर्क्रम केलेले आहेत. आमचं त्रिकुट जिथे एकत्र असेल तो कार्यक्रम छान व्हायचाच. आज सर सर्वांना सोडून कायमचे निघून गेले आहेत. मला ते नेहमी म्हणायचे सर बिनधास्त जगायचं आणि स्वतःसाठी जगायचं. कुणी कुणासाठी नसतं म्हणायचे. सर खूप विनोदी सुद्धा होते. आमचे भावजी सुनिल बनसोडे आणि ज्येष्ठ बहीण सौ. साईली बनसोडे यांना तर सर खूप मानायचे. वैयक्तिक आमचा आणि शब्द खड्गचा अत्यंत जिवाभावाचा माणूस हरपल्याचं दुःख सतत जाणवत राहील.. एकमेकांशी भांडत बसू नका, रुसवा असेल तर दोन पावले मागे या आणि बोला समोरच्याशी असा मला ते नेहमी वडिलकीचा सल्ला देत असत. सरांच्या पाश्च्यात त्यांची पत्नी, दोन मुले, भाऊ बहीण आणि त्यांनी जोडलेला प्राध्यापकांचा आणि मित्र मैत्रिणींचा खूप मोठा मित्र परिवार आहे. शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र आणि टीम तथा वैयक्तिक आमच्या जाधव, बनसोडे परिवाराकडून सरांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.