‘आजकाल चोरी पकडली की चोर त्याला ‘ऑपरेशन’ म्हणतात. भाजपच्या राजवटीत देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून ती लोकशाहीला धोकादायक आहे. जर सत्ताधारीच असे ‘ऑपरेशन’ करत असतील, तर आता देशाला वाचवण्यासाठी आपल्याला मिळून ‘ऑपरेशन कमळ’ (भाजपवर शस्त्रक्रिया) करावे लागेल’, अशा जळजळीत शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला..
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त (हीरक महोत्सव) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते..
शिवसेनेच्या स्थापनेपासून मी संघटनेचा साक्षीदार असून मागील १२-१३ वर्षे पक्षनेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. ज्याक्षणी वाटेल, त्या दिवशी मी पद सोडल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्जना करताच, संपूर्ण सभागृह उठून उभे राहिले आणि तुम्ही पद सोडू नका, असा आग्रह सर्वच शिवसैनिकांनी धरला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बंडखोर खासदार, काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची अफवा, भाजपचे हिंदुत्व आणि ठाकरे कुटुंबावर होणाऱ्या वैयक्तिक आरोपांवरून अत्यंत आक्रमक आणि भावनिक भाषण केले. 'वन नेशन, वन इलेक्शन'वरून यांची वाटचाल 'वन पार्टी, नो इलेक्शन'कडे सुरू आहे. ’असा टोला लगावत, ज्या देशात तरुणाईला 'झुरळ' मानले जाते, त्या देशाचे भविष्य काय असणार? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.
तीस वर्षे भाजपसोबत राहून आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? शिवसेना कधीही कुणात विलीन होत नसते. काँग्रेससोबत आपले टोकाचे वैर होते, पण त्यांनी कधी 'मातोश्री'वर डोळे वटारले नाहीत. भाजपने मात्र शिवसेनेला मुळासकट उपटून काढण्याचा प्रयत्न केला. भाजपचे निष्ठावान नेते आता दिल्लीच्या आदेशामुळे मिंधेंची दाढी खाजवत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
उद्धव यांनी भाजपच्या फोडनीतीवर कडाडून हल्ला केला..
निवडणूक जिंकण्यासाठी सुरक्षा दलांचा गैरवापर
‘सरदार वल्लभभाई पटेलांनी देशात प्रांत आणण्यासाठी रझाकारांवर पोलीस कारवाई केली होती. पण यांनी बंगालमध्ये एका महिलेला हरवण्यासाठी दोन-अडीच लाख पोलीस घुसवले. पक्ष फोडायला तुम्ही देशाचे सुरक्षा दल वापरता? हेच बळ मणिपूर किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये का घुसवले नाही?" असा थेट सवाल ठाकरेंनी विचारला.
उद्धव यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे :
शेतकऱ्यांना अटी आणि खासदार खरेदीला सवलती?
सहा खासदारांमुळे पक्षाचे विलीनीकरण होत नाही
मला नेतृत्वाची हाव नाही..
फुटीर खासदारांविरोधात पेटून उठण्याचे आदेश
अमित शहा यांच्यावर नाव न घेता टीका
वाजे यांचे उत्स्फूर्त स्वागत
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.