तुकाराम मुंढे यांच्या कारवाईत मुलुंडमधील प्रसिद्ध दुकानही सापडले ; ‘गुप्ता चणा भंडार’वर एफडीएची कारवाई, व्यवसाय बंद करण्याचे आदेश
लेबल नसलेले अन्नपदार्थ आणि आरोग्याला धोका; तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेचा दणका
मुंबई : अन्न व औषध प्रशसानाने (एफडीए) खाद्यपदार्थांमधील भेसळविरोधात केलेली मोहीम अधिक आक्रमक करत मुलुंडमधील ‘गुप्ता चणा भंडार’ या दुकानावर कारवाई केली. यामध्ये अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्याला घातक परिस्थिती आढळली. त्यामुळे दुकानातील सुखी पुरी, बारीक शेव, भाजलेला चणा, मुरमुरे, हिरवे वाटाणे जप्त करण्यात आले.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार तसेच सह आयुक्त (अन्न) महेश चौधरी व सहाय्यक आयुक्त मेघना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी छत्रपालसिंह देवीसिंह राजपूत व अन्नसुरक्षा अधिकारी ऋषिकेश दर्शनवाड यांच्या विशेष पथकाने मुंबईमधील बेकायदेशीर आणि मानकांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मुलुंडमधील गाळा क्र. टीजी १३७, १/१ डम्पिंग रोड, गौतम नगर, मुलुंड पश्चिम येथे असलेल्या ‘गुप्ता चणा भंडार’ या दुकानाची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान दुकानात अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्याला घातक परिस्थिती आढळली. तसेच, दुकानांमध्ये उत्पादित व विक्रीसाठी ठेवलेल्या विविध अन्नपदार्थांच्या पाकिटांवर उत्पादक, निर्मिती दिनांक किंवा मुदत संपल्याचा दिनांक असा कोणताही कायदेशीर लेबल असलेला मजकूर नव्हता. त्याची गंभीर दखल घेऊन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या दुकानातील ११४.२ किलो वजनाचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. जप्त केलेला माल हा ८ हजार २९० रुपये किंमतीचा आहे. सुखी पुरी, बारीक शेव, भाजलेला चणा, मुरमुरे, हिरवे वाटाणे यांचा समावेश आहे. सर्व साठा कायदेशीररित्या जप्त करण्यात आला असून, अन्नपदार्थांचे नमुने पुढील प्रयोगशाळा विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.