मुंबई महानगरात येत्या काही दिवसांत किमान १ लाख झाडांची लागवड करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी पडीक मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, दुभाजक, वाहतूक बेटे तसेच उड्डाणपुलांखालील जागांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे..
हरितक्षेत्र वाढवून प्रदूषण आणि धूळ नियंत्रणास मदत होईल, अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली. महापौरांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीत बुधवारी महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत या अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त, उद्यान, रस्ते व पूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापौर तावडे यांनी सांगितले की, “मुंबईतील हरित संपदा वाढविणे हे प्राधान्य असून जागतिक पर्यावरण दिनापासून सुरू झालेल्या वृक्षारोपण अभियानाला अधिक गती देण्यात येणार आहे. रस्त्यांच्या कडेला, दुभाजकांवर, वाहतूक बेटांवर आणि उड्डाणपुलांखाली झाडे लावण्यासाठी योग्य जागांचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच विलेपार्ले येथील उड्डाणपुलाखाली साकारलेल्या शहरी शेतीच्या धर्तीवर अभिनव संकल्पना राबविण्याचाही विचार करण्यात येईल.”
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.