ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आगे आगे देखो होता है क्या अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे सेनेला डिवचले आणि ठाकरे सेनेत आणखी फूट घडवून आणण्याचे संकेत दिले. मी डॉक्टर नसूनही ऑपरेशन करतो. ऑपरेशन करण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. लांडग्याचं नाही, असा टोलाही त्यांनी नुकत्याच झालेल्या ऑपरेशन टायगरचा संदर्भ देत लगावला..
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा ६० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, बाळासाहेब नावात असून चालत नाहीत. ते मनात आणि विचारात असावे लागतात. बाळासाहेबांचे खरे वारसदार शिवसैनिक आहेत. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, तर तुमच्या आमच्या काळजाचा तुकडा असल्याचे ते म्हणाले.
जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. बाळासाहेबांना जे नको होते आणि बाळासाहेबांना जिवंतपणी छळले त्यांच्यासोबत तुम्ही गेला, अशी टीकाही त्यांनी केली. ते बाळासाहेबांचे विचार वाचवण्याचं काम करणाऱ्यांना शिव्या देतात आणि ज्यांनी शिवसेना फोडली त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नावाने ओव्या गात असल्याचा उल्लेख यावेळी केला.
शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रेकॉर्ड बद्दल त्यांचे अभिनंदन केले. मोदींवर १२ वर्षात एकही भ्रष्टाचाराचा डाग न लागलेले बेदाग प्रधानमंत्री आहेत. अयोध्येत राम मंदिर उभारणी, ३७० हटवले ही बाळासाहेबांची स्वप्न त्यांनी पूर्ण केली आहेत. एनडीएच्या अभिनंदन प्रस्तावावेळी मला मानाचे पान दिले. त्यामुळे इथे मोदींच्या अभिनंदनाचा ठराव करत भारताला महासत्ता करण्याचे आणि १४० कोटी जनतेचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ मोदींना मिळो, ही इच्छा शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच नक्षलवाद संपवल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदनही केले.
सकाळी खासदारांना शिव्या द्यायच्या आणि रात्री त्यांच्याबद्दल चांगले बोलायचे, अशी शिवसेना चालत नाही. एकनाथ शिंदे लढवय्या आहे, घरात बसून चालत नाही. मुंबई सोन्याचे अंड देणारी कोंबडी म्हणून त्याकडे लक्ष दिले, अशी टीकाही ठाकरे यांच्यावर केली.
एल निनोचा सामना करण्याची तयारी झाली आहे. मी लोकांची दिवाळी काळी होऊ दिली नाही. कर्जमाफीची घोषणा केली आहे. जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना हा आपला मंत्र आहे. वारकरी, शेतकरी आणि कष्टकरी ही शिवसेनेची जबाबदारी आहे. बळीराजा हा आपला मायबाप आहे. राज्यातील तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा असल्याचे ते म्हणाले. महिलांवर अन्याय अत्याचार होतो. तिथे लाडकी सून कार्यक्रम जाहीर केला. सुनांवर अन्याय होतो, तिथे लाडकी सून कार्यक्रमातून न्याय देण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाले. देशभरातील बंजारा समाजाचे काम करण्यासाठी संजय राठोड यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. अडीच तीन वर्षात शिवसेना, गावागावात, घराघरात पोहोचवायची आहे. हे संघटनात्मक काम करायचे आहे. धनुष्यबाणाचा एकच नारा, शिवसेनेचा महाराष्ट्र सारा, चांदा ते बांधा भगवा लाव, शहर ते गाव फक्त शिवसेनेचं नाव अशी कविताही शिंदे यांनी यावेळी वाचून दाखवली.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.