अधिवेशनात आमचा प्रयत्न हा संवादाचा आहे. विरोधकांनी संवाद ठेवला तर आम्ही चर्चेतून सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहोत. त्यामुळे राजकारण केले तर राजकीय उत्तर मिळेल. समाजकारण केले तर सामाजिक उत्तर मिळेल, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विरोधी पक्षाला दिला..
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या विरोधी पक्षाच्या निर्णयाची खिल्ली उडवली.संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये विरोधक कोणताही नवा विषय हा विरोधक मांडू शकलेले नाही. ज्या प्रश्नांवर चर्चा होऊन सरकारच्या वतीने कार्यवाही झालेली आहे तेच मुद्दे पत्रात उपस्थित करण्यात आले आहेत. लोकांना अपेक्षित असलेले मुद्दे विरोधकांना अद्याप अवगत झालेले नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली.
महिलांना शेतकऱ्याचा कायदेशीर दर्जा
या अधिवेशनात एकूण १० विधेयके मान्यतेसाठी सादर केली जाणार आहेत. या विधेयकांमध्ये महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या महत्वाच्या विधेयकाचा समावेश आहे. सध्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा नाही किंवा त्यांच्या नावाने शेती नसल्यामुळे त्यांना शेतकरी समजले जात नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये सरकार महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणारे विधेयक मांडणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
राज्यात पाणी उपश्यावर बंदी
राज्यात सध्या एकूण २४ टक्के पाणीसाठा आहे, जो मागच्या वर्षी या दिवसांमध्ये ३३ टक्के होता. त्यामुळे सरकारने शेतीच्या पाण्याचे आवर्तन काही प्रमाणात बंद केले आहे. पावसाचा जोपर्यंत ठिकाणा लागत नाही तोपर्यंत पुढच्या काळासाठी पिण्याचे पाणी राखून ठेवणे गरजेचे आहे.
कर्जमाफी हा कायमचा उपाय नाही
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, या विरोधी पक्षाच्या मागणीचा फडणवीस यांनी यावेळी समाचार घेतला. २०२० मध्ये शेतकरी कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का झाला नाही? शेतकऱ्यांना २०२६ मध्ये कर्जमुक्ती का द्यावी लागली? असे सवाल करत फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी हा कायमचा उपाय नसल्याचे ठणकावून सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले..
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन तीन आठवडे म्हणजे १० जुलैपर्यंत चालणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांत महाराष्ट्राला मोठी मदत दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.