मुंबईतील मोकळ्या जागांच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली..
भाजपच्या आमदारांशी संबंधित एका खासगी ट्रस्टला मुंबईतील १६ एकर मोकळी जागा, क्रीडा संकुल आणि म्हाडाचे दोन प्लॉट्स नाममात्र किंवा मोफत दरात देण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
“मुंबईतील सार्वजनिक जागा, मैदाने आणि भूखंड हडप करून ते बिल्डर आणि कंत्राटदार मित्रांच्या फायद्यासाठी वापरण्याचे धोरण सरकार राबवत आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
“मुंबईतील जी मोकळी मैदाने सामान्य नागरिक, मुले आणि खेळाडूंसाठी उपलब्ध होती, त्या ठिकाणी आता अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” अशा सूचनाफलक लावण्यात येत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
महापालिकेत सत्ता असताना सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत सर्व मोकळी मैदाने नागरिकांसाठी मोफत खुली ठेवण्याचे धोरण होते, मात्र आता अनेक मैदानांवर टर्फ उभारून सामान्य नागरिकांना दूर ठेवले जात आहे,” असा दावाही त्यांनी केला.
आंदोलनाचा इशारा
१६ एकर जागा खासगी ट्रस्टला देण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे पक्ष येत्या आठवड्यात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहे. या आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, एनजीओ, हाऊसिंग सोसायट्या आणि मुंबईप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. मुंबईतील सार्वजनिक जागांचे संरक्षण करण्यासाठी मोठा जनआंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.