मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित..

मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी तर ४८३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर, एकूण २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित आहे. दरम्यान, जप्तीची कारवाई सुरू होताच एकूण २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी करभरणा केला आहे..

अद्यापही मालमत्ता करभरणा केले नसल्यास दिनांक ३१ मार्च २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरावे. अन्यथा, दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी विहित मुदतीत करभरणा करुन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत आतापर्यंत जमा झालेला मालमत्ता कर आणि थकबाकी याचा बैठकीत आढावा घेण्यात आला. १० मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ०२४ कोटी रुपयांचा म्हणजे ८२.०५ टक्के मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे.

आतापर्यंत ८२.०५ टक्के मालमत्ता कर संकलित झाले असले तरी ३१ मार्च २०२६ पर्यंत १०० टक्के कर संकलित होणे अपेक्षित आहे. यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. थकीत मालमत्ताधारकांविरोधात तात्काळ जप्तीची कारवाई करावी तसेच जप्त केलेल्या मालमत्तेच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी.

जप्त केलेली मालमत्ता करभरणा न करता पुन्हा वापरात आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मालमत्ताधारकावर पोलिसांत गुन्हा नोंदवावा, असे स्पष्ट निर्देशही डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

जप्ती, लिलावाची कारवाई सुरू

१० मार्चपर्यंत मुंबईतील एकूण ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडे एकूण ६ हजार ८९ कोटी इतका मालमत्ता कर थकीत आहे. कारवाई सुरू होताच यापैकी एकूण २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी करभरणा केला. या मालमत्ताधारकांकडून ७८४ कोटी ३२ लाख रुपये कर संकलित करण्यात आला. आतापर्यंत एकूण ४८३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे ४८५ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी २९३ मालमत्ताधारकांनी ६८ कोटी ७४ लाख रुपयांचा करभरणा केला. तर, एकूण २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित आहे. या मालमत्तांवर एकूण ८८४ कोटी २४ लाख रुपयांचा कर थकीत आहे.

३१ मार्चपर्यंत कर भरा, कारवाई टाळा!

थकबाकी असलेल्या सर्व मालमत्ताधारकांनी तसेच चालू आर्थिक वर्षाचा करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी मालमत्ता करभरणा करावा तसेच दंडात्मक कारवाई टाळावी. मालमत्ता करभरणा करणे प्रत्येक मालमत्ताधारकाची जबाबदारी आहे आणि ती पार पाडून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.

47

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.