अन्न व औषध प्रशासन अर्थात ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे..
२५ ते ३१ मे २०२६ दरम्यान ‘एफडीए’ने केलेल्या धडक कारवाईत राज्यात एकूण २०३ आस्थापनांवर छापे टाकण्यात आले असून याप्रकरणी १०२ जणांना अटक करण्यात आली आहे.
या मोहिमेत ८६ प्रतिष्ठाने सील करण्यात आली असून १ कोटी ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध आणि सुरक्षित महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत ही धडक मोहीम राबवण्यात आली आहे.
‘एफडीए’ने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागांत प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेते तसेच उत्पादकांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये कोकण विभागात सर्वाधिक कारवाई करत ४७ प्रतिष्ठानांवर छापे टाकून ४६ जणांना अटक करण्यात आली. मुंबईत २२ ठिकाणी कारवाई करून २३ जणांना तर पुण्यात १४ आस्थापनांवर छापे टाकून १३ जणांना अटक करण्यात आली.
याशिवाय नाशिकमध्ये पाच छापे आणि पाच अटक, छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ छापे आणि आठ अटक, अमरावतीत पाच आस्थापनांवर कारवाई करत पाच जणांना तर नागपूर विभागात दोन ठिकाणी छापे टाकून दोन जणांना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ सह अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून ३४ लाख ५ हजार रुपयांचा गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे.
भेसळयुक्त अन्नपदार्थांची तपासणी
गुटखाविरोधी मोहिमेसोबतच मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, जालना, बीड, सोलापूर, नांदेड, परभणी, रायगड, धुळे आणि इतर जिल्ह्यांमध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात तपासणी करण्यात आली. या मोहिमेत एकूण ७३ अन्न प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली असून आंबे, दुग्धजन्य पदार्थ, खवा, बेकरी उत्पादने, आईस्क्रीम, खाद्यतेल, मसाले, मिठाई यासारख्या १ कोटी २४ लाख रुपये किमतीचा सुमारे ९० हजार ६३९ किलो संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असे सांगत अन्न भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी भेसळ किंवा अवैध विक्रीबाबत विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.